रंकाळा आणि पंचगंगा प्रदूषणाबाबत आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार

Aditya Thackeray

कोल्हापूर : कोल्हापूरला भेट देऊन पाहणी करावी आणि निष्क्रिय जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करून प्रदुषण रोखण्यासाठी योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी करणारे निवेदन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या कडे प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर शहरातील रंकाळा तलाव आणि पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत सामाजिक संघटनांनी आणि पर्यावरण प्रेमींनी गेली सुमारे वीस वर्षे विविध स्तरावर आंदोलने केली. निवेदने दिली. कोर्टात खटले दाखल केले. सदर प्रकरणी मा. उपविभागीय अधिकारी, मा. उच्च न्यायालय, मा. हरित लवाद यांनी वेळोवेळी निर्देश दिले. तथापि प्रदूषण रोखण्यात फारसे यश आलेले नाही.

उच्च न्यायालयाने पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली देखरेख समिती स्थापन करून सुद्धा पंचगंगा प्रदूषण थांबलेले नाही, हे काल, शनिवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पंचनामा वरून सिद्ध होत आहे. विभागीय आयुक्त, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव,

कोल्हापूर जिल्हाधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळचे प्रादेशिक अधिकारी यांच्याकडे कित्येक तक्रारी, कित्येक निवेदने दिलेली असतानासुद्धा या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी कोणतीही कार्यवाही न करता केवळ कागदोपत्री विषय केल्यामुळे नदी प्रदूषण चालू असल्याचे दिसून येत आहे. एसी ऑफिस मध्ये बसून प्रदूषणाबाबत चर्चा करू नका तर प्रत्यक्ष प्रदूषण होत असलेल्या ठिकाणी भेट देऊन निर्णय घ्या अशी स्पष्ट शब्दात मागणी करून सुद्धा या अधिकाऱ्यांनी आज अखेर प्रत्यक्ष प्रदूषण होत असलेल्या ठिकाणाची पाहणी करून योग्य ते आदेश दिलेले नाहीत.

त्यामुळे देखरेख समिती अस्तित्वात असताना सुद्धा प्रदूषण वारंवार व सातत्याने सुरू आहे, ज्याचा परिणाम रंकाळा तलाव आणि पंचगंगा नदीतील जैवविविधतेवर होत आहे. रंकाळा तलावातील पाण्याचा रंग पूर्णपणे बदलला असून हिरवट रंगाचे पाणी दिसत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात रंकाळा तलाव पुन्हा जलपर्णीच्या विळख्यात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर पंचगंगा नदीचे पाणी काळसर रंगाचे व फेसाळ युक्त बनले असून त्यामुळे अनेक ठिकाणी मासे मृत झाले आहेत. तर पंचगंगा नदीवर अवलंबूनअसणाऱ्या गावामध्ये नागरिकांच्या जीविताला धोका उत्पन्न झालेला आहे.

निष्क्रिय सदस्य सचिवांच्या कडे हा विषय न पाठवता आपण स्वतः कोल्हापूरला भेट देऊन पाहणी करावी आणि निष्क्रिय जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करून प्रदुषण रोखण्यासाठी योग्य ते आदेश द्यावेत, ही विनंती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER