सोनी टीव्ही आणि अमिताभ बच्चन यांच्याविरोधात तक्रार

हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न - आरोप

Sony TV-Amitabh Bachchan

लातूर :- ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावणे व सलोख्याने राहणार्‍या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपात भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) व सोनी टेलिव्हिजन नेटवर्क विरोधात तक्रार नोंदवली.

पवार यांनी म्हटले आहे की, ३० ऑक्टोबर २०२० रोजी प्रसारित झालेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात – “२५ डिसेंबर १९२५ रोजी डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुयायांसोबत कोणत्या धर्मग्रंथाच्या प्रती जाळल्या?” असा प्रश्न विचारला. आपल्या देशात अनेक धर्म असतानाही प्रश्नाखालील सर्वच्या सर्व पर्याय जाणीवपूर्वक हिंदू धर्माशी निगडितच देण्यात आले. यातून हिंदू धर्मग्रंथ हे जाळण्यायोग्यच असल्याचा संदेश देण्याचा तसेच जवळपास शतकापूर्वीची घटना चर्चेत आणून गुण्यागोविंदाने एकत्र राहणाऱ्या हिंदू व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा खोडसाळ प्रयत्न लपून राहात नाही.

हिंदू धर्म अत्यंत सर्जनशील व सर्वसमावेशक आहे. काळसुसंगत अनेक चांगले बदल आत्मसात करून हिंदू धर्म समृद्ध बनलेला आहे. ढोंग घेतलेले अनेक तथाकथित बुद्धिजीवी आपल्या वक्तव्यांच्या माध्यमातून नित्यनेमाने सहिष्णू हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावत असतात. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात विचारण्यात आलेला प्रश्न हा त्याच विघातक प्रयत्नांचा भाग असून दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही, असे ते म्हणाले.

पवार यांनी सांगितले की, लातूर पोलीस अधीक्षक यांच्याकडे मी तक्रार नोंदवली आहे. हा कार्यक्रम लातूर जिल्ह्यातही प्रसारित झाल्याने लातूर पोलीस गुन्हा नोंदवू शकतात. लवकरच एफआरआय नोंदवला जाईल, अशी अपेक्षा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER