गृहमंत्र्यांविरुद्धच्या फिर्यादीची स्टेशन डायरीत नोदच नाही!

Maharashtra Today
  • हायकोर्टातील सुनावणीत धक्कादायक माहिती उघड

मुंबई: महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख (anil Deshmukh) पोलिसांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे ‘हप्ते’ गोळा करतात अशा आशयाच्या अ‍ॅड. जयश्री पाटील या महिला वकिलाने केलेल्या फिर्यादीची मलबार हिल पोलीस ठाण्याच्या स्टेशन डायरीत नोंदच केलेली नाही, अशी धक्कादायक माहिती बुधवारी उच्च न्यायालयातील (HC) सुनावणीत समोर आली.

अनिल देशमुख व परमबीर सिंग या दोघांचीही ‘सीबीआय’ (CBI) चौकशी केली जावी, यासाठी जयश्री  पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका केली आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुख यांच्या ‘सीबीआय’ चौकशीसाठी केलेल्या याचिकेसोबत पाटील यांच्या याचिकेवरही मुख्य न्यायाधीश न्या. दीपंकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.

तुम्ही फिर्याद दिलीत, त्याचे पुढे काय झाले? असे मुख्य न्यायाधीशांनी विचारल्यावर पाटील म्हणाल्या, फिर्याद देऊनही पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही. जबाबासाठी चार-पाच दिवसांनी बोलवा, असे सांगूनही अद्याप बोलावलेले नाही.

त्यावर मुख्य न्यायाधीशांनी संबंधित पोलीस ठाण्याची स्टेशन डायरी मागवून घेण्यास अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी यांना सांगितले. दखलपात्र गुन्ह्याची फिर्याद दाखल झाल्यावर पुढे काय कारवाई केली हे पाहण्यासाठी स्टेशन डायरी मागविण्यात आली.

दु. ४.३० च्या सुमारास संबंधित पोलीस अधिकारी स्टेशन डायरीशिवाय कोर्टात आला. त्याच्याकडून माहिती घेऊन अ‍ॅडव्होकेट जनरलनी अशी धक्कायादक माहिती न्यायालयास दिली की, जयश्री पाटील यांच्या फिर्यादीची पोलीस ठाण्याच्या ‘इनवर्ड रजिस्टर’मध्ये नोंद आहे, पण स्टेशन डायरीमद्ये त्याची नोंद नाही. हे संभाषण होईपर्यंत न्यायालयाची नेहमीची वेळ संपत आली होती. परंतु स्टेशन डायरी हजर झाल्याशिवाय आम्ही उठणार नाही, असे सांगून न्यायमूर्तींनी ठरलेल्या वेळेनंतरही सुनावणी सुरु ठेवली.

आधी हेटाळणी, नंतर प्रशंसा
गृहमंत्री अनिल देशमुख व परमबीर सिंग या दोघांचीही ‘सीबीआय’ चौकशी केली जावी यासाठी जयश्री लक्ष्मणराव पाटील या महिला वकिलाने केलेली याचिका ही जनहित याचिका नसून निव्वळ झटपट प्रसिद्धीसाठी केलेली याचिका आहे, अशी हेटाळणी उच्च न्यायालयाच्या न्या. संभाजी शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठाने मंगळवारी केली होती. मात्र त्याच जयश्री पाटील यांची आज मुख्य न्यायाधीश न्या. दीपंकर दत्ता यांनी प्रशंसा केली. या प्रकरणी पोलिसांकडे जाऊन फिर्याद देण्याचे धैर्य दाखविणाºया श्रीमती पाटील या एकट्या आहेत, असे प्रशंसोद््गार मुख्य न्यायाधीशांनी काढले.

याआधी, ‘तुम्ही पोलीस आयुक्त होतात. मग दखलपात्र गुन्हा घडतोय हे दिसल्यावर तुम्ही स्वत:च ‘एफआयआर’ का नोंदविला नाही?’ आणि ‘एफआयआर’ न नोंदविता तपास कसा करणार व जो तपास सुरुच झाला नाही तो ‘सीबीआय’कडे कसा देणार?’ अशा प्रश्नांची सरबत्ती मुख्य न्यायाधीशांनी दुसरे याचिकाकर्ते परमबीर सिंग यांचे ज्येष्ठ वकील विक्रम नानकानी यांच्यावर केली होती. या पार्श्वभूमीवर जयश्री पाटील यांनी आपण या प्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे, असे सांगितल्यावर मुख्य न्यायाधीशांनी त्यांचे कौतुक केले.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button