लोकलमधून पडून मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या वारसांना मिळाली भरपाई

Local Train - Bombay High Court
  • रेल्वेचे खोटेपणाचे सर्व मुद्दे हायकोर्टाने फेटाळले

मुंबई : अतोनात गर्दीमुळे मुंबईतील धावत्या लोकल ट्रेनमधून (Local Train) खाली पडून मरण पावलेल्या तीन प्रवाशांच्या वारसांना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) प्रत्येकी आठ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे.

भरपाईची रक्कम सहा आठवड्यांत चुकती केली नाही तर तिच्यावर चुकती करेपर्यंत ९ टक्के दराने व्याज द्यावे लागेल, असाही आदेश न्यायालयाने दिला.

आकाश दिलीप सकपाळे (वय १८ वर्षे), सुरेश घरत (४७) आणि शंकरलाल गिरी (५५) या मयत प्रवाशांच्या वारसांनी केलेली अपिले मंजूर करून न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी हे आदेश दिले. शंकरला  भांडूप आणि कांजूरमार्ग दरम्यान धावत्या लोकलमधून खाली पडून त्यांचे दोन्ही पाय मांडीपासून कापले गेले होते. सुरेश घरत नाहूर आणि मुलुंड दरम्यान गाडीतून खाली पडून डोके फुटल्याने मरण पावले होते. तर दिलीप सकपाळे ठाणे आणि रबाळे स्टेशनच्या दरम्यान लोकलमधून खाली पडला होता. या तिघांच्या वारसांनी भरपाईसाठी केलेले दावे रेल्वे न्यायाधिकरणाने फेटाळले म्हणून उच्च न्यायालयात अपिले केली गेली होती.

या तिन्ही प्रकरणांत भरपाई देण्याची जबाबदारी नाकारताना रेल्वेने प्रामुख्याने दोन मुद्दे मांडले होते. एक, संबंधित प्रवासी धावत्या गाडीतून खाली पडला याला काही पुरावा नाही, कोणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. त्यामुळे हा मृत्यू गाडीतून पडून नव्हे तर रेल्वे रुळ ओलांडताना गाडीची दडक बसून झाला आहे. यात चूक रुळ ओलांडणाºयाची आहे. दोन, हे तिघेही लोकलने प्रवास करणारे प्रवासीच नव्हते कारण त्यांच्याकडे प्रवासाचे कोणतेही वैध तिकिट किंवा पास नव्हता.

हे दोन्ही मुद्दे फेटाळताना न्यायालयाने म्हटले की, हे प्रवासी रेल्वे रुळ ओलांडताना मरण पावले हे दाखविण्यासाठी रेल्वेने संबंधित स्टेशनमास्तरचे अहवाल व पोलिसांचे पंचनामे सादर केले आहेत. पण हे दस्तावेज तयार करणाºयांनी घटना प्रत्यक्ष पाहिलेली नाही. त्यांनी ऐकिव माहितीवर हे अहवाल लिहिले आहेत. ज्या लोकलची ठोकर बसली असे रेल्वे म्हणते तिच्या मोटरमनचीही साक्ष काढली नाही. त्यामुळे ते विश्वासार्ह मानता येणार नाहीत. मयत प्रवाशांकडे तिकीट नसण्याविषयी न्यायालयाने म्हटले की, प्रवाशाने तिकीट काढलेच नव्हते या गृहितकावर रेल्वेचे हे म्हणणे आधारित आहे. प्रवाशाच्या मृतदेहाचा किंवा तो जेथे सापडला त्याच्या आजूबाजूला शोध घेऊनही तिकिट सापडले नाही, असा पंचनाम्यात कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे प्रवासी खाली पडला तेव्हा त्याचे तिकिट बाजूला पडून नंतर गहाळ झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

न्यायालयाने आणखी एक महत्वाची बाब नमूद केली. ती अशी: रेल्वे रुळ ओलांडणे हा गुन्हा आहे, असे रेल्वे प्रशासन म्हणते. पण त्यांनी यापैकी एकाही घटनेची गुन्हा म्हणून नोंद केलेली नाही. उलट तिन्ही घटनांची नोंद ‘अपघाती मृत्यू’ अशी केलेली आहे व दंडाधिकार्‍यांनी ते स्वीकारून प्रकरण बंद केले आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button