वारंवार वीजपुरवठा बंद पडल्यास ग्राहकांना भरपाई देणे बंधनकारक

RK Singh
  • वीजपुरवठा कंपन्यांसाठी सक्तीची नियमावली

नवी दिल्ली : एका ठराविक  मर्यादेहून जास्त वेळा किंवा सतत वीजपुरवठा बंद पडल्यास यापुढे वीजपुरवठा कंपन्यांना त्यासाठी ग्राहकांना भरपाई देणे बंधनकारक असणार आहे. भरपाईची ही रक्कम एक लाख रुपयांपर्यंत असू शकेल. राज्य वीज मंडळे व खासगी कंपन्या या दोघांनांही हे बंधन लागू असेल.

सन २००३ च्या वीज कायद्याने दिलेले अधिकार वापरून केंद्र सरकारने वीजपुरवठा करणाºया कंपन्यांसाठी प्रथमच सक्तीची अशी सेवा नियमावली तयार केली आहे. या नियमावलीने प्रथमच ‘वीजपुरवठा’ हा एक सेवाउद्योग (Service Industry) असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. नियमावलीत वीजकंपन्यांसाठी विविध सेवांच्या दर्जाचे किमान निकष ठरविण्यात आले आहेत. ‘वीजग्राहकांच्या हक्कांचा जाहीरनामा’ असे या नियमावलीचे नाव आहे.

ही नियमावली प्रसिद्ध करताना केंद्रीय वीजमंत्री आर. के. सिंग (R.K. Singh) म्हणाले की, वीजपुरवठयासाठी उभारली जाणारी यंत्रणा ही ग्राहकांच्या सेवेसाठी असते व दर्जेदार आणि विश्वासार्ह वीजपुरवठा मिळणे हा ग्राहकांचा हक्क आहे. आपले अस्तित्वच मुळात ग्राहकांना सेवा देण्यासाठी आहे व ग्राहक हे आपल्या दावणीला बांधलेले नाही, याचे भान ठेवून कंपन्यांनी यापुढे काम करण्याची गरज आहे.

भरपाईसंबंधीचा हा नियम आधी त्या त्या राज्यातील वीज नियामक आयोग प्रसिद्ध करेल. त्यानंतर सहा महिन्यांत वीजकंपन्यांना त्यानुसार भरपाई देण्याची आॅनलाईन व्यवस्था लागू करावी लागेल. वीजपुरवठा पूर्णपणे बंद राहणे किंवा निर्धारित दाबाहून कमी दाबाने होणे अशा दोन्हींसाठी ही भरपाई द्यावी लागेल.  तांत्रिक कारणांसाठी किती काळ व किती वेळ वीज पुरवठा बंद राहणे क्षम्य मानले जाईल याचे निकष राज्य वीज नियामक आयोग ठरवून देईल. त्याहून जास्त वेळा व जास्त काळ वीजपुरवठा बंद राहिल्यास ग्राहकांना भरपाई मिळेल. भरपाईचे सूत्र नियामक आयोग ठरवेल. ग्राहकाच्या चालू महिन्याच्या किंवा पुढील महिन्याच्या बिलात भरपाईची रक्कम स्वतंत्रपणे दाखवून बिलात तेवढी सूट द्यावी लागेल. देखभाल व दुरुस्तीच्या नियमित कामासाठी वीजपुरवठा बंद ठेवायचा असेल तर त्याची पूर्वसूचना त्या भागातील सर्व ग्राहकांना ‘एसएमएस’ने देणेही वीजपुरवठा कंपन्यांवर बंधनकारक असेल.

नियमावलीतील अन्य काही महत्वाच्या तरतुदी अशा:
-एक हजार रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचे बिल फक्त इलेक्ट्रॉनिक माध्यामानेच भरता येर्ईल. त्याहून कमी रकमेचे बिल रोख किंवा चेकने भरता येईल.

-मोबाईल कंपन्या पाठवतात तसा बिल भरण्याविषयीचा ‘अ‍ॅलर्ट’ ग्राहकांना पाठवावा लागेल.

-बिल ठराविक तारखेनंतर ६० दिवसांहून अधिक विलंबाने दिल्यास त्या बिलात ग्राहकांना ‘प्रमाणित’ सूट द्यावी लागेल.

-नव्या वीज जोडणीचा अर्ज  ऑनलाईनही करता येईल. त्यासाठी फक्त ओळख दाखविणारा व संबंधित ठिकाणी वास्तव्य करीत असल्याचा एवढेच दस्तावेज द्यावे लागतील. हे दस्तावेज अर्जासोबत  ऑनलाइन अपलोड करता येतील.

-ग्राहकाने अर्ज केल्यापासून महानगरांमध्ये सात दिवसांत, अन्य शहरांमध्ये १५ दिवसांत व ग्रामीण भागांत जास्तीत जास्त ३० दिवसांत नवी वीजजोडणी देणे कंपनीवर बंधनकारक असेल.

-ग्राहक त्यांच्या गच्चीवर व छतावर सौरऊर्जा संयत्र बसवून स्वत:पुरता वीजनिर्मिती करू शकेल. तसेच तयार होणारी वीज त्याच्या गरजेहून जास्त असेल तर इतरांनाही देऊ शकेल. थोडक्यात ग्राहक केवळ ‘कन्झ्युमर’ (Consumer) न राहता ‘प्रॉस्युमर’ही (Prosumer) होऊ शकेल.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER