बलात्कारित अल्पवयीन मुलीला गर्भपात करून मिळणार भरपाई

Raped Minor Girl - Bombay High Court - Maharashtra Today
  • आईच्या याचिकेवर हायकोर्टाचा आदेश

मुंबई : बलात्कारामुळे गरोदर राहिलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील एका अल्पवयीन व गतिमंद मुलीचा तात्काळ गर्भपात करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) जिल्हा रुग्णालयास दिला.

१७ वर्षे वयाच्या या मुलीच्या आईने केलेली याचिका मंजूर करून न्या. संभाजी शिवाजी शिंदे व न्या. मनिष पितळे यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. लैंगिक गुन्ह्याने पीडित महिलांना भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने सुरु केलेल्या ‘मनोधैर्य’ योजनेनुसार या मुलीला भरपाई देण्याचा आदेशही दिला गेला. यासाठी रत्नागिरी जिल्हा विधीसेवा समितीने तिचे प्रकरणे लगेच हाती घेऊन योजनेनुसार  विविध टप्प्यांची भरपाईची रक्कम विनाविलंब चुकती करायची आहे.

या मुलीची मासिक पाळी चार महिने चुकल्यानंतर ती गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. हे दुष्कृत्य करणाºयांची नाव तिने आई-वडिलांना सांगितली व त्यानंतर आरोपींविरुद्ध या महिन्याच्या सुरुवातीस भादवि कलम ३७६ खेरीज बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वयेही (Pocso ACT) गुन्हा नोंदविण्यात आला.

मुलीचे गर्भारपण लक्षात येईपर्यंत कायदेशीर गर्भपातासाठी असलेली पाच महिन्यांची (२० आठवडे) मुदत टळून गेली असल्याने न्यायालयात याचिका केली गेली. गर्भपात कायद्यात अपवादात्मक परिस्थितीत तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने पाचवा महिना उलटून गेल्यानंतरही गर्भपात करण्याची तरतूद आहे. त्यात गर्भारपण सुरु ठेवण्याने स्त्रीवर गंभीर मानसिक आघात होणे ही एक अपवादात्मक परिस्थिती दिली आहे. त्याच्या स्पष्टिकरणात असे नमूद केले गेले आहे की, गरोदरपण बलात्कारामुळे लादले गेले असेल तर ते मानसिकदृष्ट्या क्लेषदायक असल्याचे गृहित धरले जाईल.

कायद्यातील या तरतुदीचा आधार घेऊन न्यायालयाने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीकडून या मुलीचा तपासणी करून घेतली. समितीने गर्भपात करण्यास अनुकूल अहवाल दिल्यानंतर तसा आदेश दिला गेला. आरोपींविरुद्धच्या खटल्यात ‘डीएनए’ चाचणी करून पुरावा म्हणून वापरता यावा यासाठी काढून टाकलेल्या गर्भाचे ‘टिश्यू’ व रक्ताचे नमुने जतन करून ठेवण्याचाही आदेश दिला गेला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER