आधी सरकारमध्ये संवाद साधा; मग सुसंवादासाठी बोलवा – फडणवीस

मुंबई :- विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारनं आज आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर विरोधी पक्ष भाजपाने बहिष्कार टाकला. ‘सरकारमधील पक्षांमध्ये आपसातच सुसंवाद नाही. ते बोलतात एक आणि करतात एक. आधी त्यांनी आपसात संवाद साधावा. मग आम्हाला चहापानासाठी व सुसंवादासाठी बोलवावे, असा टोमणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मारला. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज ही पत्रकार परिषद झाली. फडणवीस यांच्यासह विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपाचे नेते व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार व इतर उपस्थित होते.

मुंबईत अनेक वसाहतींबाहेर लागत आहेत सीएएला समर्थन देणारे फलक

सरकारच्या कारभारावर टीका करताना फडणवीस म्हणाले की – ‘या सरकारची दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत नाही अशी अवस्था आहे. त्यांच्यातच विसंवाद आहे. सरकारनं शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. अकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काहीही मदत मिळालेली नाही. आमच्या ज्या कर्जमाफीला नावे ठेवली, तीच पद्धत त्यांनी अमलात आणली. कर्जमाफीमध्ये केवळ पीककर्जाचा समावेश आहे. शेडनेट, पशुपालन अशा कर्जाचा यात समावेश करण्यात आलेला नाही. ही फसवणूक आहे. अशा परिस्थितीत आम्ही सरकारच्या चहापानाला जाऊ शकत नाही.

‘राज्यात महिलांवरील अत्याचार पराकोटीला गेला आहे. पोलीस दलाचं खच्चीकरण केलं जात असल्यानं त्यांचं मनोबल घटलं आहे. त्यामुळे गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाली आहे. त्याविरोधात आम्ही आवाज उठवू.’ असं फडणवीस म्हणाले. भीमा कोरेगाव आणि एल्गार हे वेगळे नाही, हेच आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. तपासाची व्याप्ती आता वाढली असल्याने तो केंद्र सरकारकडे जाणेच योग्य आहे, असे ते म्हणाले.

जलयुक्त शिवार, वृक्षारोपणबाबत झालेल्या कामांवरच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, आम्ही कोणत्याही प्रकारच्या चौकशीला घाबरत नाही. या कामांबाबत खोटे आरोप करून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय उत्तम काम केले. मी त्यांचे अभिनंदन करतो.