राष्ट्रकुल स्पर्धा : सायनाला सुवर्ण, सिंधूला रौप्यपदक

सिडनी : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीच्या अंतिम फेरीत भारताच्या सायना नेहवालनं पी. व्ही. सिंधूवर मात केली. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात २१ -१८ , २३ -२१ असे दोन सेट सरळ जिंकून सायनानं बाजी मारली, आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.

५६ मिनिट चाललेल्या या सामन्यात सायनाने पी.व्ही. सिंधूचा सरळ पराभव केला. सायनाने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. तिने ८-४ ची आघाडी मिळवत सिंधूला एकही गुण घेऊ दिला नाही. तरीही सिंधूनेही धीर सोडला नाही, लढत देत १८ – २० असा स्कोर केला. पण लगेच एक गुण मिळवत २१ – १८ अशी आघाडी मिळवली.

दुसऱ्या डावात सिंधूने पुनरागमन करत ७ – ५ अशी आघाडी घेतली पण सायनाने ८ – १० असा स्कोर करत बाजी पलटवली. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात दोघींनीही २० – २० असे समसमान गुण मिळवले होते. पण काही क्षणातच सायनाने बाजू पलटवत, पी. व्ही सिंधूचा पराभव केला.

सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला, तरी भारताला पारड्यात रौप्य पदकही आलं. उपांत्य फेरीतील सामने जिंकत दोघींनी अंतिम फेरीत धडक मारली होती. आता भारताच्या पारड्यात सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्हीही पदकं पडली.

पुरुष एकेरी गटात वर्ल्ड नंबर वन किदांबी श्रीकांतला पराभवाचा सामना करावा लागला. श्रीकांतचा मलेशियाच्या ली चोंग वी ने १९-२१, २१-१४, २१ -१४ असा पराभव केला. श्रीकांतला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.