राष्ट्रकुल स्पर्धा : दहाव्या दिवशी भारताच्या पदरी आले आठ सुवर्णपदक

गोल्ड कोस्ट : ऑस्ट्रलिया येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज दहाव्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताच्या पदरी सुवर्णपदक आले. बॉक्सिंगमध्ये भारताच्या मेरी कोम आणि गौरव सोळंकीने आणि विकास कृष्णनने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. त्यांनतर नेमबाजीत संजीव राजपूत आणि भालाफेकमध्ये नीरज चोपडा याने भारताला सुवर्णपदक जिंकले. तर कुस्तीत पुरुषांमध्ये सुमितने १२५ किलो वजनी गटात आणि महिलांमध्ये विनेश फोगटने ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. तर टेबल टेनिसपटू मनिका बत्रानं देखील सुर्वणपदक मिळवला. त्यामुळे भारताच्या खात्यात आज आतापर्यंत एकूण आठ सुवर्णपदकांची भर पडली आहे.

मेरी कोमने अंतिम फेरीत नॉर्दन आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहाराचा ५-० गुणांनी पराभव केला. पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन आणि ऑलिंपिक ब्राँझपदक मिळवणाऱ्या ३५ वर्षीय मेरी कोमने महिलांच्या ४८ किलो गटाच्या उपांत्य फेरीत श्रीलंकेच्या ३९ वर्षीय अनुषा दिलरुक्षीवर ५-० असा विजय मिळवला होता. अंतिम फेरीतही मेरी कोमने यशस्वी कामगिरी करत सुवर्णपदक पटकावल्याने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करत तिचे अभिनंदन केले आहे.

बॉक्सिंगमध्ये भारताला गौरव सोळंकीनेही सुवर्णपदक मिळवून दिले. गौरवने ५२ किलो वजनी गटात अंतिम फेरीत नॉर्दन आयर्लंडच्या ब्रेंडन इर्विनचा ४-१ने पराभव केला. तर विकास कृष्णनने पुरुषांच्या ७५ किलोग्रॅम गटात सुवर्णपदक मिळविले.दरम्यान, नेमबाज संजीव राजपूत याने ५० मीटरर रायफल थ्री पोजिशन्समध्ये सुवर्णपदक जिंकले. तर भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोपडा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अंतिम फेरीत नीरजने ८६.४७ मीटर इतका लांब भाला फेकला. कुस्तीत पुरुषांमध्ये सुमितने १२५ किलो वजनी गटात आणि महिलांमध्ये विनेश फोगटने ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.

टेबल टेनिसपटू मनिका बत्रा भारताला ‘सातवे आसमां पर’ घेऊन गेली. पहिल्या गेममध्ये १-६ अशी पिछाडीवर पडलेल्या मनिकानं झुंजार पुनरागमन केलं आणि हा गेम ११-७ नं जिंकला. त्यानंतर तिचा आत्मविश्वास इतका उंचावला की, इंग्लंडच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला डोकं वर काढण्याची संधीच तिने दिली नाही. पुढचे तीनही गेम खिशात टाकत तिनं सुवर्णपदक जिंकलं.