कोल्हापूर : आत्महत्या केलेल्या मुलीच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट

dead-body

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगले तालुका येथील पुलाची शिरोली येथील हायस्कूलमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजा इंद्रबहादूर बिंद (वय १४) असे या मुलीचे नाव आहे.

बुधवारी सकाळी आठच्या सुमारास मुलीच्या आईने व तिच्या बहिणीने लटकता मृतदेह खाली उतवरून शेजारील युवकांच्या मदतीने मृतदेहांची विल्हेवाट लावली. पोलिसांनी या प्रकरणी मुलीची आई शकुंतला इंद्रबहादूर बंद (वय ४०), बहीण मनीषा पोपट डिगे (२४) व सुभाष ऊर्फ बाळू भगवान गावडे (५०) या तिघांवर मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, संबंधित मुलगी आईसोबत शिरोलीत बाळूमामा मंदिरामागील धनगर वसाहतीमध्ये भाड्याने राहत होते. शेजारील खोलीत त्या मुलीची विवाहित बहीण राहत होती. बुधवारी सकाळी या विद्यार्थिनीने आई कामाला गेली असता, सकाळी साडेआठच्या सुमारास घरातील तुळीस गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तिच्या बहिणीने पाहिली. तिने आईला बोलावून घेतले. आईला बोलावून घेतल्यानंतर शेजारील लोक गोळा झाले. शेजारील तरुणांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवण्यात आला. पोलिसांना माहिती न देता तीनचाकी प्रवासी रिक्षातून हा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला. दरम्यान याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस घटनास्थळी गेले असता मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेल्याचे समजले. पोलिसांनी स्मशानभूमीकडे गेले असता मृतदेहाला अग्नी देण्यात आला होता.