
नवी दिल्ली :- कमर्शियल अर्थात व्यापारी गॅस सिलेंडर तसेच विमानाच्या इंधन दरात सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी शुक्रवारी वाढ केली. घरगुती गॅस सिलेंडर दरात मात्र कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत 19 किलो वजनाच्या व्यापारी गॅस सिलेंडरचे दर 1332 रुपयांवरुन 1349 रुपयांवर गेले आहेत. कोलकाता येथे हेच दर 1410 रुपयांवर गेले असून चेन्नई येथे 1464 तर मुंबईत 1280.50 रुपयांवर गेले आहेत.
गेल्या महिन्यात घरगुती गॅस सिलेंडर दरात 100 रुपयांची वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर घरगुती गॅस सिलेंडरचे दर 694 रुपयांवर गेले होते. दुसरीकडे पाच किलो वजनाच्या गॅस सिलेंडरचे दर 18 रुपयांनी वाढविण्यात आले होते. नव्या वर्षाच्या सुरुवातीला घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले असून व्यापारी गॅस सिलेंडरचे दर वाढविण्यात आले आहेत. दरम्यान, तेल कंपन्यांनी विमानाच्या इंधन दरात अर्थात एटीएफमध्ये 3.7 टक्क्यांनी वाढ केली आहे.
ताज्या दरवाढीनंतर दिल्लीत एटीएफचे प्रति किलोलिटरचे दर 50 हजार 979 रुपयांवर गेले आहेत. एटीएफ दरात 1 डिसेंबर 2020 पासून झालेली ही तिसरी दरवाढ आहे. याआधी 1 डिसेंबर रोजी एटीएफ दरात 7.6 टक्क्यांनी तर 16 डिसेंबर रोजी 6.3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला