राष्ट्रवादीच्या करेक्ट कार्यक्रमाची लवकरच सांगता? महापौरांविरोधात काँग्रेसची तक्रार

Jayant-Patil-Viswajit-Kadam-Maharashtra Today

सांगली : मोठा दिमाखात भारतीय जनता पक्षाचा करेक्ट कार्यक्रम करत सांगली महानगरपालिकेत सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये आता मतभेद निर्माण व्हायला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी (Digvijay Suryavanshi)हे कोणालाही विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेत आहेत. काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना विश्‍वासात घेतले जात नाही. ऑनलाईन महासभेत अनेक भानगडीचे विषय मांडतात, असा आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांवर केला आहे. सूर्यवंशी यांच्याविरोधात काँग्रेसच्या नगरसेवकांनी पक्षाचे नेते तथा राज्यमंत्री विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam)यांच्याकडे तक्रार केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन सांगली महानगरपालिकेतील भाजपची सत्ता उलथवून टाकली. भाजपचेच नगरसेवक गळाला लावून महापालिकेत सत्ता मिळवणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये अवघ्या सहा महिन्यांतच मतभेद निर्माण झाले आहे. पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा करेक्ट कार्यक्रम करत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी महापौर झाले. मात्र, त्यानंतर महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला डावलण्यास सुरवात केली.

राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या अनेक निर्णयांबाबत काँग्रेसच्या नगरसेवकांना अंधारात ठेवण्यात आल्याचे आरोप करण्यात आले आहेत. काँग्रेस नगरसेवक मंगेश चव्हाण, अभिजित भोसले आदींनी उघडपणे राष्ट्रवादीच्या कारभारावर आक्षेप घेत राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम यांच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. ऐनवेळच्या ठरावात आणखी किती ठराव केले असतील, अशी शंकाही काँग्रेसच्या नगरसेवकांनी उपस्थित केली आहे. राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांची काँग्रेसच्या नगरसेवकांनी भेट घेऊन राष्ट्रवादीच्या कारभाराबाबत तक्रारी केल्या आहेत. डॉ. कदम यांनी तक्रारी ऐकून पुढील आठवड्यात बैठक घेऊन, पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी याबाबत चर्चा करू, असे आश्वासन दिल्याचे नगरसेवकांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button