‘कॉमेडियन’ मुनव्वर फरुकीची झाली अंतरिम जामिनावर सुटका

Munawar Faruqui
  • उत्तर प्रदेशातील वॉरन्टलाही स्थगिती

नवी दिल्ली :- हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून मध्य प्रदेश पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यात ‘कॉमेडियन’ मुनव्वर फरुकीची (Munawar Faruqui ) सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामिनावर सुटका केली. याच संदर्भात उत्तर प्रदेशातील न्यायालयाने जारी केलेल्या फरुकीविरुद्ध जारी केलेल्या वॉरन्टलाही स्थगिती दिली गेली.

फारुकी मुळचा गुजरातचा आहे. इंदूरच्या ५६ दुकान भागातील एका कॅफेमध्ये झालेल्या कार्यक्रमात हिंदू देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह भाष्य केल्याच्या आरोपावरून २ जानेवारी रोजी अटक झाल्यापासून फारुकी तुरुंगात आहे. इंदूरच्या भाजपा आमदार मालिनी लक्ष्मण सिंग गौर यांच्या एकलव्य सिंग या मुलाने दाखल केलेल्या फिर्यादीवरून फारुकी यास अटक झाली. फिर्यादीत फारुकीखेरीज एडविन अ‍ॅन्थनी, नलिन यादव, प्रखर व्यास व प्रियम व्यास यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने २८ जानेवारी रोजी फारुकी व नलिन व्यास यांचे जामीन अर्ज फेटाळले होते. त्याविरुद्ध फारुकीने सर्वोच्च न्यायालयात दोन याचिका केल्या. एक याचिका जामिनासाठी तर दुसरी इंदूर पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी आहे. पोलिसांनी फारुकी यास अटक करताना दंड प्रक्रिया संहितेच्या कलम ४१(१) चे पालन केले नाही, असे त्यांचे ज्येष्ठ वकील सौरभ कृपाल यांनी निदर्शनास आणल्यावर न्या. रोहिंग्टन नरिमन व न्या. भूषण गवई यांच्या खंडपीठाने अंतरिम जामीन मंजूर केला.

ज्या फिर्यादीत आरोपीला अटक करण्याची गरज नाही, असे तपासी अधिकाºयास वाटत असेल अशा प्रकरणात त्यांनी आरोपीला जबाबासाठी हजर राहण्याची नोटीस काढावी. आरोपी हजर झाला तर त्याला अटक करू नये. हजर झाला नाही तरच अटक करावी, असे कलम ४१(१) सांगते. पोलिसांनी प्रत्येक प्रकरणात या प्रमाणे कारवाई करणे बंधनकारक आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने अर्नेश कुमार वि. बिहार सरकार या प्रकरणात सन २०१४ मध्ये दिला होता.

अजित  गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER