या चला ! दिवाळी सार्थकी लावू या

Diwali Celebration

आज धनत्रयोदशी (Dhantrayodashi) . अनेक वर्षांपासून धनत्रयोदशीचे महत्त्व  अनेक कथांमधून सांगितले जाते. लक्ष्मी क्षीरसागरातून सोन्याचा कलश आणि धनदेवता कुबेरासह कशी प्रगट झाली होती, आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लक्ष्मीने कुबेराला सोबत आणले असे मानले जाते. तसेच धनत्रयोदशी म्हणजे धन्वंतरी या आरोग्याच्या देवतेची पूजा करण्याचा दिवस. त्यामुळे आरोग्यप्राप्ती होते. एकूणच दिवाळीचा सण हा धनधान्य, समृद्धी ,आरोग्य आणि आनंद देणारा. यावेळी हवेतही गुलाबी थंडी असते .शेतातील धान्य घरी येते .एकूणच आनंदी आनंद गडे ! अशी परिस्थिती असते. त्यात उजळणारे दिवे हे जगातील अंधकार दूर करण्यासाठी असतात; पण त्यांचा उद्देश हा केवळ नेहमी झगमगाट असतो त्याच ठिकाणी प्रकाशमान होण्याचा नसतो तर खेड्यापाड्यात एकूणच अंधार लयाला जावा हीच त्यामागे अपेक्षा असते;

पण या वर्षीची दिवाळी आणि एकूण परिस्थिती खूपच वेगळी आहे. आणि म्हणूनच दिवाळी वेगळ्या प्रकारे सार्थकी लावावीशी वाटते. भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लक्ष्मीने कुबेराला सोबत आणले. मला असं वाटत आहे की, समाजातील सगळ्या लोकांच्या सुख-समृद्धीसाठी प्रत्येक घरातल्या लक्ष्मीने आपल्याला मिळालेल्या कुबेराकडच्या वाट्यातून जास्तीत जास्त वाटा समाजासाठी बाहेर काढण्याची वेळ हीच आहे.

कोरोनाचे थैमान आणि वारंवार लागणारा लॉकडाऊन यातून आत्ता आत्ता कुठे लोक थोडा मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. तरीही कोरोनाची आणखी लाट येणार असल्याची चिन्हे आहेतच. अनेक लोकांचे रोजगार गेलेले आहे. काही ठिकाणी पगार झालेले असले तरी बोनस मिळू शकलेले नाही. इतके दिवस रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस थोडे सैलावले असले तरीही त्यांना सतर्क राहावे लागणार आहे. जे लोक कोरोनामुक्त झालेले आहेत त्यांनाही बरेच साईड इफेक्ट जाणवत आहेत, असं ऐकिवात असून पोलीस लोकांचे मानसिक स्वास्थ्य ताण व इतर आजारांनी  affect होत आहे. अशा वेळी आपल्या आजूबाजूच्या परिसरात निराशा, चिंतेचे, दुःखाचे सावट असेल तर आपल्यापैकी किती जण आनंदात राहू शकतील ? नक्कीच नाही ! बरेच लोक आपापल्या पद्धतीने समाजाला मदत करतही असतील.

तर काही जण विचारतील; मग काय आम्हीपण तोंड पाडून बसणार का? मुळीच नाही ! अहो सुस्मित विकत घ्यायला पैसा लागत नाही .परंतु आपल्या सुस्मिताची किंमत मात्र खूप जास्त असते.

असाही विचार येईल कदाचित की, एवढा मोठा देश, त्यात आम्ही काही करून काय फायदा ? सरकारने करावे काय करायचे ते ! आणि ज्याचे त्याचे भाग्य! पण असा विचार तुम्ही नक्कीच करणार नाहीत असं वाटतंय. आणि सरकारचे म्हणाल तर ते मुळीच शांत बसलेले नाही. रिझर्व बँक आणि आता केंद्र सरकार नगदी पैसा अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी कसून प्रयत्न करत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एकूण २.६५ लाख कोटी रुपयांच्या उपाययोजना जाहीर केल्या. आत्मनिर्भर तिसरा एपिसोड हा याचाच भाग. त्या अंतर्गत एकूण १२ घोषणा केल्या आहेत. यापैकी ७ घोषणा थेट ग्राहकांशी, सर्वसामान्यांशी निगडित आहे. विकासक व घर खरेदीदाराला प्राप्तिकरांमध्ये दिलासा, पंतप्रधान आवास योजना शहरात राबवण्यात १८ हजार कोटींची तरतूद ,आत्मनिर्भर भारत रोजगार योजना, कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीतील १२ टक्के वाटा सरकार उचलणार , खतांसाठी ६५ कोटींचे अनुदान ,पंतप्रधान गरीब कल्याण योजनेसाठी १० हजार कोटी आणि कोरोना लस संशोधनासाठी ९०० कोटी रुपये या सगळ्याच योजना सर्वसामान्यांशी संबंधित आहेत. कोरोनामुळे परिणाम झालेल्या हेल्थकेअर आणि अन्य २६ क्षेत्रांसाठी क्रेडिट गॅरंटी स्कीम जाहीर केली आहे. तसेच बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्राला दिलासा म्हणून परफॉर्मन्स सिक्युरिटी घटवून ३ टक्के केली.

म्हणजे थोडक्यात करता येतील ते प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. त्यात काही त्रुटी असतीलही; पण आता वेळ आली आहे आमची भूमिका तपासून बघायची.  या सगळ्या परिस्थितीत आम्हाला जे काही उपलब्ध आहे त्यापैकी थोडं जरी आम्ही इतरांसाठी वापरू शकलो तरी खूप काही हाती लागेल. श्रीरामचंद्रांच्या नेतृत्वाखाली सेतू बांधत असताना खारीने विचार केला नाही की, माझ्यामुळे केवढीशी मदत होईल. खारूताईची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आपल्याकडे लहानपणापासूनच एक तीळ सात जणात वाटून खाण्याची गोष्टही सांगितली जाते. तिचे अनुकरण करण्याची हीच ती वेळ ! सभोवताली बघताना आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये, विषमता दिसून येते. शिक्षण, लिंगभाव वस्त्रप्रावरणे, राहणीमान म्हणजे थोडक्यात आर्थिक, सामाजिक ,वैचारिक सगळ्यात स्तरांवर ही विषमता आहे. मुख्य म्हणजे ही विषमता एखाद्या उतरंडीसारखी असते. म्हणजे एकदम उच्चभ्रू आणि एकदम गरीब यांच्यामध्येही कनिष्ठ मध्यमवर्ग, मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग हे आढळतातच.

शिक्षण आणि लिंगभाव या बाबतीतही ही उतरंड जाणवते. फक्त वस्त्रप्रावरणे आणि राहणीमान हे काही अंशी वृत्तीवर अवलंबून आहे असे मला वाटते. बरेचदा अशिक्षित लोकांचे किंवा वार्षिक उत्पन्न कमी असणाऱ्या लोकांचेही राहणीमान ,वस्त्रप्रावरणे उच्च प्रतीची असू शकतात; कारण एक तर त्यांची आर्थिक स्थिती किंवा ऋण काढून सण साजरे करण्याची वृत्ती.परंतु थोडक्यात ही विषमता उतरंडीसारखीच असते .

या दिवाळीत उतरंडीमध्ये माझ्याखाली कोण कोण आहे? आणि त्यांना मी कुठल्या प्रकारे मदत करू शकतो किंवा शकते ? याचा विचार करून त्या प्रमाणात मी माझीही दिवाळी मर्यादित केली तर?

दरवर्षी दिवाळीत नवीन कपडे आपण घेऊ शकतो किंवा आजकाल नवीन कपडे घ्यायला दिवाळी लागते असंही नाही. मग हेच नवे कपडे मी जर ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी घेतले तर ? जे फराळाचे घरी बनवणार त्याचा समान हिस्सा ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी ठेवला तर ? दरवर्षी भाऊबीज पाडवा यात आपणच आपले परस्परांचे खिसे कापतो.तीच भाऊबीज आणि पाडवा आज काही गरजू बहिणीसाठी व मुलींसाठी भेट देऊन साजरा केला तर? घरात वर्षानुवर्षांचे खूप कपडे चादरी ब्लॅंकेटस पडलेल्या आहेत. रस्त्यावर खूप जण पुलाखाली झोपलेले दिसतात. या दिवाळीत त्यांच्यासाठी हे जास्तीचे कपडे वापरून त्यांना ऊब दिली तर ?

माझ्या एका ओळखीच्या काकू आहेत. सध्या या व्हाट्सअपवर मेसेजेस फिरतात आहे, की चार घर दिव्यांनी उजळू या! त्यावर त्यांचा विचार सुरू होता.  कुठे जाणार आता अशी घरं शोधायला ?

पण असं काही करण्यासाठी फार दूर कुठे जाऊन विशेष काही करण्याची गरज नाही. आपल्याच आजूबाजूला धुणं-भांडी करणाऱ्या आपल्या सख्या, अंगण झाडायला येणारे आजी-आजोबा, समोरच्या झोपडीतील वॉचमन काका, असे अनेक लोक वावरत असतात. त्यांच्यासाठीही काही केलं तरी त्यांची दिवाळी साजरी होईल. आणि समाधानाचा दीप आपल्या मनात लागेल.

याचबरोबर अज्ञानाची विषमता पण दूर करून ज्ञानाचे दिवे पण लावायला हवेत. दिवाळी म्हटले की, सुशिक्षित काही लोकांचे फिरणे, प्रवास परत सुरू झाले आहे. नाही गेल्या वर्षी कुठे, केली घरीच दिवाळी साजरी तर कुठे बिघडणार आहे ? कोरोनाची लाट परत येणार असेल तर  त्याचा बंदोबस्त करण्याआधी पूर्व काळजी घेणे जास्त आवश्यक आहे आणि ती आपल्या हातात आहे. फटाके न उडवणे ही पण आपल्या ‘बस की बात’ आहे.

याशिवाय या वर्षी फक्त दिवाळीच्या सीझनमध्ये काही उद्योग चालतात असे विक्रेते ! दिव्याच्या माळा, अत्तर, फुलांच्या माळा ,लाह्या ,बत्तासे,उदबत्त्या ,उटणे ,सुगंधी तेल ,लक्ष्मीचे कागद, तेलवाती, तूपवाती अशा गोष्टी मात्र आवर्जून खरेदी करा किंवा सध्या अनेक जणांचे रोजगार गेलेले आहेत, त्यांच्याकडील गृहिणी दिवाळीचा फराळ करून देत आहेत हे लक्षात घेऊन आपल्याला जर शक्य असेल तर यावेळी आपण फराळाची ऑर्डर देऊ शकतो किंवा काही पदार्थ त्यांच्याकडून मागवू शकतो. ही पण त्यांच्यासाठी मदतच होईल. रांगोळीच्या रंगवाल्यांशी हुज्जत घालून ,पण बाजूच्या मॉलमधून मात्र एक-एक  डेकोरेटिव्ह दिवे २५० रुपयांना  खरेदी करायचे ही पण मन:स्थिती बदलायलाच लागेल. काही तरी कष्ट करून जे लोक आपल्या आजूबाजूला पोट भरतात आहे त्यांना जरूर मदत करायला हवी.

आम्ही आमची दिवाळी म्हणून काही करायचेच नाही का? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर माझी या वेळची दिवाळी सार्थकी लावण्याची कल्पना अशी आहे. वर सांगितल्याप्रमाणे चार घरांमध्ये मी दिवे लावू शकेल, अंधार दूर करू शकेल अशा गोष्टी मी केल्या आहेत.

आणि माझ्यासाठी ? यावेळी पाहुणेमंडळी नाही. फराळ बऱ्यापैकी रेडिमेड आणलेला. त्यामुळे आराम करणे, घरातल्यांशी मस्त गप्पा करणे, दिवाळी अंकांचे मनसोक्त वाचन, अनेक वर्षांपासून इच्छा असूनही करू शकले नाही, त्या रांगोळ्या काढणे आणि रेडिमेड फराळाचा आस्वाद घेऊन एनर्जी वाचेल ,तसा एकेक ताजा पदार्थ करून घरातल्यांना खाऊ घालणं. (यात आणखी एक गोष्ट मला करायची होती की, बरेच दिवसांत अनेकांना फोन करून भरपूर बोलणे होत नाही, त्यांना फोन करणे.) पण मला लक्षात आलं, यावेळी मी जी आगळीवेगळी दिवाळी करणार आहे, याचा अर्थ सगळ्याच घरामधून अशी दिवाळी नाही. त्यामुळे दिवाळीत असा भरपूर बोलायला वेळ फारसा कोणाकडे नसेल, विशेषतः मैत्रिणींना !

दरवर्षीच्या माझ्या अनुभवाप्रमाणे बहुतेक घरातील स्त्रियांना यापैकी एकही गोष्ट दिवाळीमध्ये  करायला वेळ मिळत नाही. उलट पाहुणे, फराळ ,पूजा ,पक्वान्नांचे जेवण या सगळ्यांमध्ये ऊर फुटेस्तोवर धावावे लागते. तेल लावा ,औक्षण करा ,उटणे लावा , फराळ द्या, स्वयंपाक करा, गोडधोड करा, घरदार सजवा, साफसफाई करा ,पणत्या लावा, गिफ्टची खरेदी करा…

चला तर मग या वर्षी अशी ही दिवाळी सार्थकी लावूया ! माझ्याशिवाय इतरही चार घरातले दीप उजळून तिथेही दिवाळी आणू या !

आजच्या धनत्रयोदशीच्या सर्व वाचकांना मनःपूर्वक शुभेच्छा !

मानसी गिरीश फडके.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER