ये नववर्षा….ये…ये !

New Year

हाय फ्रेंड्स ! सर्वप्रथम नववर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ! आज सकाळी माझ्या एका ज्येष्ठ मैत्रिणीची, सौ सुलेखा आराध्ये यांची एक सुंदर कविता मला आली. ये नववर्षा …ये …ये ! स्वागत आम्ही उभी मोदे, भंगू दे दुःख सारे, निरामयतेचे वरदान दे. कटू स्मृतींना नकोच थारा, प्रेम देऊ, प्रेम घेऊ, प्रेम शांतीने भरू गाभारा. किती सुंदर ! किती आशावाद आहे त्यात. मानवाचे हे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे त्याची ही विजिगीषू वृत्ती.

मागचे पूर्ण वर्ष अतिशय कठीण होते. काही आप्तजनांना बरेच जणांना गमवावे लागले. काहींच्या नोकऱ्या गेल्या. तुमच्या माझ्यासारख्यांना तरी कदाचित कमी झळ पोहोचली. पण हाताची कामे गेल्याने काहींना गावे सोडावी लागली, तर काही खंदे वीर आपले घरदार, नातेवाईक, मुलेबाळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून, रुग्णांची सेवा करत राहिले. कित्येक डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस काहींनी यापैकी लोकांचे जीव वाचवताना, स्वतःचे प्राण गमावले.

फ्रेंड्स ! पण काल या सगळ्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून, कायमसाठी त्यांच्या ऋणात राहून आपण मागच्या वर्षाचा निरोप घेतला. आज सकाळी जेव्हा मी डोळे उघडले आणि बाहेरची सूर्य किरणे मला दिसली, त्यावेळी पहिल्यांदा मी प्रार्थना केली,” देवा ! हे वर्ष सर्व मानवजातीला, प्राणीमात्रांना आणि सजीवसृष्टीला, एकूणच सगळ्यांना खूप खूप आरोग्यपूर्ण, शांततापूर्ण आणि समाधानाचे जावो.”

ही बातमी पण वाचा : ‘जाणता’ घडण्यासाठी

पण तरीही ,आमचेही काही योगदान असायला हवं आहे. याचाही तर विचार व्हायला हवा ना ? एक कवी म्हणतो,” व्हॉट इन लाइफ? वी आर लुझिंग इट इन लिविंग” मग अशा कोणत्या गोष्टींनी आमचे आयुष्य सुधारते? कशाने आमच्यातले वेगळेपण उठून दिसेल? सकाळी उठून आपण उत्साही असतो? सक्रिय असतो? आनंदी असतो? बरेच जणांना तेच ते रुटीन खूप कंटाळवाणं वाटतं. पण बरेच जण असेही दिसतात, जे दिवसभर ताजे, टवटवीत असतात. असंच एका डॉक्टरांना हा प्रश्न केला की सारखी दुःखी आणि वेदनामय चेहरे पाहून तुम्हाला कंटाळा नाही येत? पुढे हा त्यांच्या प्रोफेशनचा भाग आहे, प्रॅक्टिस चालण्यासाठी तर ते आवश्यक असतं. असंही काही जण म्हणतील. पण यावेळी त्यांनी जे उत्तर दिले होते, ते खूप वेगळा दृष्टिकोन देणारं होतं. हा माझ्या वर्क एथिक्स चा भाग आहे. पेशंटला फक्त औषधे बरी करतात असं नाही. त्यांची मानसिकता सकारात्मक ठेवणं, मानसिक बळ देणं ही माझी जबाबदारी आहे. वर्क एथिक्स ह्या शब्दाची जाणीव रोजच्या कामाला चैतन्य, अर्थपूर्णता मिळवून देते.

बऱ्याच लोकांना, काय? कसं चाललंय? असं विचारलं तर उदासवाण्या चेहऱ्याने उत्तर येतं ,”चाललय आपलं दररोज चं रुटीन. बस! नवीन काही नाही.” किंवा काही लोक सारखं विचारतात,” मग आणखीन काय नवीन ? “म्हणजे दररोज नवीन काय घडायला हवं असतं? पण या दोन्हीमधला मनुष्य रोबोट सारखा जगत असतो. किंवा परीस शोधण्याचा प्रयत्न करत असतो.” काय हो, टीव्ही तरी काय बघायचा. त्याच बातम्या, नी तीच ती नाचगाणी ! “यांना आयुष्याकडून काय हव असतं ते त्यांनाच कळत नाही.

एक छान गोष्ट आहे आहे. एक तरुण अनेक दिवसापासून बेकार होता. त्यांच्याच गावात एक साधू राहत असे. एक दिवस तो त्यांच्याकडे गेला .आपली परिस्थिती सांगितली. श्रीमंत होण्याचे काही उपाय आहे का? असा त्यांनी हट्ट धरला .साधू त्याला म्हणाला,” समुद्राच्या किनार्‍यावर जा, तेथे तुला परिस सापडेल .दूसऱ्या दिवशी सकाळी तो तरुण किनार्‍यावर गेला .मैलोगणती पसरलेले हजारो दगड तेथे पसरलेले होते .त्याच्या हातातील काठीला लोखंडाचे टोक होते. एका दगडाला त्याने टोक लावले, सोन्याचे झाले का पाहिले. नंतर दुसरा दगड, नंतर तिसरा असा क्रम सुरू झाला .दुपारनंतर त्याने गती वाढवली. कंटाळला. पण परिस अद्याप तरी सापडला नव्हता. साधू ने सांगितले होते त्यामुळे त्याचे काम सुरू होते. आता प्रत्येक दगडाला काठीने स्पर्श करीत भराभर तो समोर जात होता.

सायंकाळ झाली .तो थकून खाली बसला. साधूने आपल्याला बनवलं असा विचार मनात सुरू असतानाच त्याचे लक्ष काठी कडे गेले .तिचे टोक मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चकाकत होते. ते सोन्याचे झाले होते. हताशपणे त्याने त्या हजारो दगडांकडे पाहिले. यांत्रिकपणे काठी टेकवता टेकवता परिस हातातून केव्हाच निसटून गेला .हे त्याच्या लक्षातच आले नाही. बऱ्याच लोकांच्या आयुष्याची शोकांतिका अशीच तर असते .आपण यांत्रिकपणे रोज धावत असतो. भानावर नसतो आणि परीस शोधत राहतो. पण जीवन समृद्ध करणाऱ्या परिस हाती लागतच नाही.

आजकालची आणखीन एक गोष्ट म्हणजे आपण सगळे , ग्लोबल वॉर्मिंग वर वगैरे थेट चर्चा करतो, हो !आणि फक्त चर्चाच करतो. मात्र आज घराघरातही तापमान वाढायला लागले आहे. कारण हे प्रदूषण कमी करणारे समंजसपणाचे, सोशिकतेचे, सुसंवादाचे वृक्ष सर्वत्रच झपाट्याने कमी होत आहेत. आपला त्रास समोरच्याला कळतो, हाच संबंधांचा पाया असतो. एकमेकांना माणसं समजून घेऊ शकत नाहीत, म्हणूनच भांडणं होतात.

ज्या काळात महिला शिक्षण हा प्रकारच नव्हता, त्या काळात महादेवरावांनी रमाबाईला शिकायला लावले. त्यांच्या घरातील वडीलधाऱ्या स्त्रियांचा या प्रकाराला सक्त विरोध होता. रमाबाईंना त्रास देऊन तो व्यक्तही केला जात होता. तेव्हा रमाबाईंना रानडेंनी जे सांगितले ते लक्षात ठेवले तर घराघरातले अर्धे संघर्ष कमी होतील. ते म्हणाले,”काय? आजचा सपाटा कसा काय आहे? हल्ला तर फारच जोराचा आहे बुवा. तो फार दिवस त्रास देईलसे वाटते. पण, पण आपणाला तितकीच उलट तयारी केली पाहिजे. आपण तितक्याच सोशिकपणे व धीमेपणाने हे सर्व सहन केले पाहिजे, आपण चुका करून त्यांचा राग वाढण्याला आपल्याकडून जागाच द्यायची नाही. त्यांच्या वेळेच्या समजुतीप्रमाणे त्या बोलतात, पण यांना दुखवायचे नाही. त्यात त्यांचा दोष नाही. उत्तर द्यायचे नाही एवढे तू कर. त्यांचे तसे बोलणे ऐकून घेणे जरा त्रासाचेच आहे, हे मी समजतो.”

सोशिकपणा, समंजसपणा, समोरचा दुखावणार नाही याची काळजी घेणे हे पारिवारिक जीवनात गुण अत्यावश्यक असतात. दुसऱ्यांचे अनेकदा खाली मान घालून ऐकून घ्यावे लागते पण आपल्यावर प्रेम करणाऱ्यांचे आपण का नाही ऐकायचे ? मुळात एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवली पाहिजे की, आपल्या समोर शत्रू उभा नाही. समंजसपणाचा अर्थच हा असतो. काळ, अनुभव अपेक्षा यामुळे हे विचारांमध्ये अंतर स्वाभाविक आहे. आज प्रचंड प्रगतीमुळे आणि गतिमान तंत्रज्ञानामुळे वाढते आहे पण याचा अर्थ आपण समंजसपणाला आणि सोशिकपणालाच सोडचिठ्ठी द्यावी असाही तर नाही. म्हणूनच संवाद महत्त्वाचा ठरतो. मुख्य म्हणजे हा संवाद सक्रीय हवा, सगळ्यांचा सहभाग असणारा असा असावा, संवाद म्हणजे उपदेश ही नाही, समर्थनही नाही तर मनमुक्त चर्चा. हा आपापसातील संवाद घडायलाच हवा. म्हणूनच मी तरी माझ्या मैत्रिणीच्या सुरात सूर मिसळून एवढेच म्हणेल,”नववर्षा ! तू इतकेच कर, लढणाऱ्याला बळ दे, किंचित अवघड वाट जरी, तुझा खंबीर हात दे!”

मानसी गिरीश फडके.
समुदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER