लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र घ्या; शिवसेनेचा आग्रह!

CM-Uddhav

मुंबई :- २०१९ मधे होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसोबत महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकत्र निवडणूक घेणे सोयीचे असते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर काही महिन्यांपूर्वीच विधानसभा विसर्जित केल्यास दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्या जाऊ शकतील, असे संकेत निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिल्यानंतर शिवसेनाही दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याच्या तयारीत आहेत. भाजपाचा काय भरवसा? लोकसभा जिंकण्यासाठी शिवसेनेचा वापर करून घेतील व विधानसभेला ठेंगा दाखवतील. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र घ्या, असा प्रस्ताव भाजपाला दिल्याचे सेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.

ही बातमी पण वाचा : “या” तीन राज्यात पुन्हा भाजपाची सत्ता येणार : नितीन गडकरी

निवडणूक आयोगाने याबाबतचे संकेत दिल्यानंतर भाजपानेही तशी तयारी सुरू केली असल्याचे समजते. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेला गोंजारण्याचे धोरण भाजपाने स्वीकारले आहे. शिवसेनेला दुखावू नका, असे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनीही सांगितलेले आहे. त्यामुळे चार वर्षे रिक्त असलेले विधानसभेचे उपाध्यक्षपद शिवसेनेला देण्यात आले, तर आ. नीलम गोऱ्हे यांच्या उपसभापतीपदासाठी स्वत: मुख्यमंत्र्यांनी भरपूर प्रयत्न केले. शिवाय, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सेनेवर गेल्या कित्येक दिवसांत टीका केलेली नाही.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र घेण्याची शक्यता?

तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीमधील जागावाटपाचा प्रश्न लवकरच सुटला जाणार आहे. उद्या निवडणूक जाहीर झाली, तरी आमची तयारी आहे. केंद्र व राज्य सरकारवर समाजातील सर्वच घटक नाराज आहेत. या नाराजीत वाढ होऊ नये, म्हणून भाजपा नेते घायकुतीला आले आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.
दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या, तरी आमची तयारी आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी म्हटले आहे.