कलाकार आणि त्यांच्या स्वभावाला मॅच होणारे रंग

आज धूळवड आहे. सात रंगांपैकी काही रंगाचे मिश्रण करून नवे रंगही तयार केले जातात आणि धूळवड साजरी केली जाते. होळी हा बॉलिवूडचाही (Bollywood) अत्यंत आवडता सण आहे. सिनेमात जसे होळीचे रंग दिसतात तसेच रंग कलाकार वास्तव जीवनातही दाखवत असतात. सात रंगांनी बॉलिवूड व्यापलेले आहे. पण तसे पाहायला गेले तर प्रत्येक रंगाचे स्वतःचे एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक रंगाचे वैशिष्ट्य लक्षात घेऊन कोणत्या कलाकाराला कोणता रंग सूट होतो ते आज आम्ही तुम्हाला होळीच्या निमित्ताने सांगणार आहोत. या यादीत सगळ्याच कलाकारांचा समावेश करणे शक्य नाही. त्यामुळे सध्या जे प्रचंड लोकप्रिय आहेत त्यांचाच समावेश आम्ही या लेखात केला आहे.

हृतीक रोशन (Hrithik Roshan) – सफेद रंग

‘कहो ना प्यार है’ सिनेमातून हृतीक रोशनने रुपेरी पडद्यावर आगमन केले होते. पिता राकेश रोशन यांच्यापेक्षाही नायक म्हणून हृतीकने प्रचंड यश मिळवले. आज २० वर्षांनंतरही हृतीक रोशनची लोकप्रियता कायम आहे. विविध प्रकारच्या भूमिका साकारून हृतीकने त्याच्या अभिनयाची क्षमताही दाखवून दिली आहे. अभिनयासोबतच उत्कृष्ट डांस आणि अॅक्शन ही त्याची बलस्थाने आहेत. हृतीक रोशनचे व्यक्तिमत्त्व  सफेद रंगाशी खूप मेळ खाणारे आहे. सफेद रंग पवित्रता, शुद्धता, शांती आणि सभ्यतेचे प्रतीक आहे. सफेद रंग पाहिल्यानंतर मनाची चंचलता संपुष्टात येते, व्यक्ती सकारात्मक विचार करू लागतो. हृतीककडे पाहिल्यानंतर याची प्रचिती येते म्हणूनच त्याच्या एकूण व्यक्तिमत्त्वामुळेच आम्ही त्याला सफेद रंग देत आहोत.

आमिर खान (Aamir Khan) – निळा रंग

आमिर खान १९८८ मध्ये ‘कयामत से कयामत तक’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये आला आणि पहिल्याच सिनेमापासून तो प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला. काही काळ त्याने मिळेल ते सिनेमे केले; पण नंतर त्याने अत्यंत निवडक सिनेमे करण्यास सुरुवात केली. त्याने मि. परफेक्शनिस्ट म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. आजही तो सिनेमात काही तरी वेगळे देईल या अपेक्षेने त्याच्या सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहात असतात. आमिर शांत स्वभावाचा असून तो आपल्या कामात १०० टक्के देण्याचा प्रयत्न करतो. आमिरचा हा स्वभाव निळ्या रंगाशी खूप मिळताजुळता आहे. निळा रंग स्नेह, शांती, पवित्रता आणि वीरतेचे प्रतीक आहे. तसेच हा रंग सत्यभाषी, धार्मिक, धैर्यवान बनवणाराही आहे. आमिरचा एकूण स्वभाव पाहता हा रंग त्याला पूर्णपणे सूट होत असल्यानेच आम्ही त्याला हा रंग दिला आहे.

सलमान खान (Salman Khan) – हिरवा रंग

सलमान खाननेही १९८८ मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’मध्ये छोटीसी भूमिका साकारून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर १९८९ मध्ये राजश्रीच्या ‘मैंने प्यार किया’तून तो नायक म्हणून प्रेक्षकांसमोर आला आणि प्रचंड लोकप्रिय झाला. आज त्याच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचे सिनेमेही आज बॉक्स ऑफिसवर कोट्यवधीची उड्डाणे करतात. सिनेमासोबतच तो समाजसेवाही करीत असून यासाठी त्याने एका एनजीओचीही स्थापना केली आहे. याशिवाय तो सिनेमाव्यतिरिक्त विविध व्यवसायामध्येही सक्रिय आहे. तो जे काही करतो ते भव्य असते. हिरव्या रंगाचेही तसेच आहे. हिरवा रंग हा राजसी, अभिमानास्पद आणि निरंकुश प्रवृत्तीचे प्रतीक आहे. हा रंग मनाला प्रसन्नता आणि ताजेपणा तर देतोच; मानसिक तणावातूनही दूर करतो. ज्या व्यक्तींना विनोद आवडतो, सतत कार्यरत असतात, चंचलही असतात आणि त्याच वेळेस आत्मविश्वासाने परिपूर्णही असतात.  त्यांच्यासाठी हा रंग पूर्णपणे सूट होतो. कारण या रंगाची हीसुद्धा वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच आम्ही हा रंग सलमान खानला दिला आहे.

अक्षयकुमार (Akshay Kumar) – काळा रंग

अक्षयकुमारला काळा रंग दिल्याने तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल. काळा रंग म्हणजे दुःखी किंवा वाईटाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. पण तसे नाही. काळ्या रंगाची आणखीही काही वैशिष्ट्ये आहेत. त्या वैशिष्ट्यांमुळेच आम्ही अक्षयला काळा रंग दिला आहे. अक्षयकुमार एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आला आहे. कोणीही गॉडफादर नसताना त्याने बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आज त्याचे सिनेमे कोट्यवधींचा व्यवसाय करत असल्याने निर्माते त्याला साईन करण्यासाठी धडपडत असतात. खानांना टक्कर देत त्याने हे यश प्राप्त केले आहे. ‘सौगंध’ सिनेमातून त्याने सुरुवात केली आणि नंतर खिलाडी अक्षयकुमार म्हणून स्वतःची इमेज तयार केली. सुरुवातीला त्याला कोणी गंभीरतेने घेत नव्हते; पण त्याने मेहनत करून स्वतःला सिद्ध केले. काळा रंग वाईट मानला जात असला तरी हा रंग प्रतिकूल परिस्थितीशी लढा देणाऱ्यांचा आहे. कितीही संकटे आली तरी हार न मानता संघर्ष करण्याचे बळ हा रंग देतो. हा रंग सुरक्षा कवच म्हणूनही ओळखला जातो. अक्षयचा स्वभाव आणि एकूण प्रवास पाहता हा रंग त्याला पूर्णपणे सूट होत आहे.

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) – लाल रंग

कपूर खानदानातील रणबीर कपूरचा बॉलिवूडमध्ये प्रवेश अत्यंत सुखकर झाला. मात्र बॉलिवूडमध्ये फक्त प्रवेश होऊन चालत नाही तर अभिनयाच्या बळावर येथे टिकून राहावे लागते. यशस्वी कपूर कुटुंबाचे ओझे पाठीवर घेऊन तो आला आणि त्याने स्वतःचे स्थान येथे निर्माण केले. संजय लीला भंसालीने ‘सांवरिया’मधून रणबीर कपूरला लाँच केले. सुरुवातीला काही अपयशी सिनेमे दिल्यानंतरही आज त्याच्यावर कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणारे निर्माते आहेत. आज तो एक यशस्वी कलाकार म्हणून ओळखला जातो. रणबीर कपूरला तुम्ही कधीही भेटलात तर तो नेहमीच उत्साहाने फसफसलेला दिसतो. त्याच्या चेहऱ्यावर कधीही तुम्हाला नैराश्य दिसणार नाही. एखादा दुःखी असेल तर तो त्याला आनंदी करण्याचा प्रयत्न करतो. लाल रंगाचेही हेच वैशिष्ट्य आहे. लाल रंग ऊर्जा, स्फूर्ती, महत्त्वाकांक्षा, क्रोध, पराक्रम, उत्साह आणि शक्तीचे प्रतीक आहे. हा रंग कठीण प्रसंगांना हसत हसत सामोरे जाण्यास शिकवतो. माणसाला साहसी बनवतो. रणबीरचा प्रवास पाहता हा रंग त्याला पूर्णपणे सूट होत आहे.

आता आपण नायिकांकडे वळू

दीपिका पदुकोन  (Deepika Padukone)- पिवळा रंग

पिता विश्वविख्यात खेळाडू असताना आणि स्वतःही राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू असताना दीपिकाने बेभरवशाच्या बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहचली. फरहा खानने तिच्या महत्त्वाकांक्षी ‘ओम शांती ओम’मध्ये शाहरुखच्या नायिकेच्या रूपात दीपिकाला लाँच केले. त्यानंतर दीपिकाने मागे वळून पाहिले नाही. अत्यंत संवेदनशील असलेल्या दीपिकाला नैराश्याने घेरले होते. प्रियकराने दगा दिला होता. मात्र या सगळ्यावर मात करीत तिने कामावर लक्ष केंद्रित केले आणि यश मिळवले. कोणी तरी सतत आपल्याकडे लक्ष द्यावे, असे दीपिकाला वाटत असते. यासाठी ती प्रचंड प्रयत्न करीत असते. पिवळ्या रंगाचेही असेच आहे. पिवळा रंग आनंद, ऐश्वर्य, कीर्ती, भव्यता आणि योग्यतेचे प्रतीक आहे. तसेच हा रंग आवडत असलेल्या व्यक्ती कोणत्याही टीकेकडे लक्ष न देता आपले काम करीत राहतात. दीपिकाचा स्वभाव असाच असल्याने आम्ही तिला पिवळा रंग दिला आहे.

कॅटरीना कैफ (Katrina Kaif) – हिरवा रंग

सलमान खानला हिरवा रंग दिला आहे म्हणून आम्ही कॅटरीनाला हिरवा रंग देतो आहोत असे नाही. कॅटरीनाला स्वतःलाही हिरवा रंग खूप आवडतो. परदेशात वाढलेली आणि शिकलेल्या  कॅटरीनाने अत्यंत वाईट अशा ‘बूम’ सिनेमात सेक्सी भूमिका साकारली होती. मात्र या पहिल्या सिनेमात केलेली चूक तिने नंतर केली नाही. सलमानच्या सान्निध्यात आल्यानंतर कॅटरीनात बदल झाला आणि ती यशस्वी झाली. हिरवा रंग हा राजसी, अभिमानास्पद आणि निरंकुश प्रवृत्तीचे प्रतीक आहे. हा रंग मनाला प्रसन्नता आणि ताजेपणा तर देतोच; मानसिक तणावातूनही दूर करतो. आत्मविश्वासाने परिपूर्ण कॅटरीना नेहमी राजेशाही पद्धतीने राहते. तिला हिंदी येत नसतानाही तिने बॉलिवूडमध्ये यश मिळवले आहे. हा हिरव्या रंगाचाच परिणाम असल्याने आम्ही तिला हिरवा रंग दिला आहे.

आलिया भट्ट (Alia Bhatt) – लाल रंग

भट्ट परिवारातील आलियाने अत्यंत कमी वयात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. १९९९ मध्ये अक्षयकुमार आणि प्रीती  झिंटाच्या ‘संघर्ष’ सिनेमात तिने प्रीती झिंटाच्या लहानपणीची भूमिका केली होती. त्यानंतर निर्माता-दिग्दर्शक घरात असतानाही आलियाला करण जोहरने ‘स्टुडंट ऑफ द ईयर’मधून लाँच केले. आलियाने अभिनयाच्या बळावर विविध प्रकारच्या भूमिका साकारून ती केवळ शोभेची बाहुली नसून एक चांगली अभिनेत्री असल्याचेही सिद्ध केले आहे. आलिया प्रचंड महत्त्वाकांक्षी असून काम चांगले व्हावे म्हणून ती पूर्ण प्रयत्न करीत असते. त्यामुळेच तिच्याकडे मोठ्या बॅनरचे सिनेमे तर आहेतच; प्रेक्षकांनाही ती प्रचंड आवडते. लाल रंग ऊर्जा, स्फूर्ती, महत्त्वाकांक्षा, पराक्रम, शक्ती आणि उत्साहाचे प्रतीक आहे. आलियाचा स्वभावही असाच असल्याने आम्ही तिला लाल रंग दिला आहे.

तुमच्याही मनात बॉलिवूडमधील कलाकारांना त्यांच्या स्वभावानुसार रंग द्यायचा असेल तर अवश्य द्या आणि आम्हाला तो कळवाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button