कलर्स वाहिनीचा राजसाहेबांना मराठीत ‘मनसे माफीनामा’ तर मुख्यमंत्र्यांना इंग्रजीत पत्र

Colors channel apology to MNS and uddhav thackeray.jpg

मुंबई : गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानू (Jan Kumar Sanu) याने बिग बॉस (Big Boss) या रिअॅलिटी शोमध्ये मराठी भाषेचा द्वेष करणारं वक्तव्य केल्याने सर्व स्तरावरून त्याचा विरोध करण्यात येत आहे . दरम्यान, शिवसेना (Shivsena) आणि मनसे (MNS) नेत्यांनी बिग बॉसचा शो बंद पाडण्याचा इशारा दिल्यानंतर तातडीने कलर्स वाहिनीचे संचालन करत असलेल्या वायकॉम १८ (Viacom 18) या कंपनीने माफीनामा सादर केला आहे. विशेष म्हणजे आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना आणि नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कंपनीकडून माफीनामा पाठवण्यात आला आहे.

वायकॉमने पाठवलेल्या दोन माफीनाम्यांची चर्चा होण्याचे कारण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आलेला माफीनामा इंग्रजीत आहे तर राज ठाकरे यांना मराठीतून माफीनामा पाठवण्यात आला आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

वायकॉम १८ ने मराठी भाषेचा अवमान करणाऱ्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. कलर्स वाहिनीवरील बिग बॉस या शोमध्ये २७ ऑक्टोबर रोजी प्रसारित झालेल्या भागात स्पर्धक जान कुमार सानूने मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. या आक्षेपाची आम्ही नोंद घेतली आहे. भविष्यात प्रदर्शित केल्या जाणाऱ्या सदर मालिकेच्या भागांतून आक्षेपार्ह विधान वगळण्यात येत आहे. मराठी भाषेबद्दल करण्यात आलेल्या या विधानामुळे जर नकळत महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत. आमच्यासाठी प्रेक्षक महत्त्वाचे आहेत. मराठी आणि देशातील प्रत्येक भाषेचा आम्ही आदर आणि पुरस्कारही करतो, असे या माफीनाम्यात नमूद करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER