मैत्रीच्या आठवणीला आला रंग

friendship

रंग माझा वेगळा या मालिकेत येणार नवी एन्ट्री या प्रोमोने लक्ष वेधून घेतले आहे. ही नवी एन्ट्री अभिनेत्री अभिज्ञा भावे हिची आहे हे देखील आता प्रेक्षकांना कळले आहे. तुला पाहते रे मालिकेतील मायरा ही कार्पोरेट गर्ल उत्तम साकारल्यानंतर आता अभिज्ञा कोणत्या नव्या भूमिकेत दिसणार हा तिच्या चाहत्यांचा प्रश्न तिने या नव्या मालिकेच्या निमित्ताने सोडवला आहे. अभिज्ञा या नव्या रोलसाठी तर खूश आहेच पण तिला अजून एका वेगळ्या कारणासाठी आनंद झालाय आणि तो म्हणजे या मालिकेत तिला तिच्या जुन्या ऑनस्क्रीन मैत्रीणीसोबत स्क्रीन शेअर करायला मिळणार आहे. हो अर्थातच रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा म्हणजेच रेश्मा शिंदेसोबत अभिज्ञाने दहा वर्षापूर्वी लगोरी…मैत्री रिटर्न ही मालिका केली होती. आता पुन्हा त्या मैत्रीच्या आठवणी जागवायला मिळणार यामुळे दोघींनाही खूपच आनंद झाला आहे.

वर्णाने सावळ्या असलेल्या मुलींना समाजात नेहमीच दुय्यम स्थान मिळते. अनेकदा अशा मुलींना त्यांच्या कुटुंबीयांकडूनही हिणवले जाते, पण आयुष्यात वर्ण महत्वाचा नसून ती स्वभावाने किती चांगले आहात, माणूस म्हणून तुम्ही किती उजळ आहात यावर तुमचे व्यक्तिमत्व दिसते हा संदेश या मालिकेतून देण्यात आला आहे. अभिनेत्री रेश्मा शिंदे या मालिकेत वर्णाने काळ्या मुलीची भूमिका साकारत आहे. सध्या ही मालिका रंजक वळणावर आली असून नायिकेच्या वर्णावरून तिचा द्वेष करणाऱ्या सासूचा भूतकाळ शोधण्यासाठी धडपड करणाऱ्या दीपासमोर अनेक गोष्टी उघड होत आहेत. याच वळणावर या मालिकेत तनुजा भारद्वाज हे नवं पात्र येणार आहे. तनुजाची भूमिका अभिज्ञा करणार आहे.

आता हे झालं मालिकेतील अभिज्ञाच्या एन्ट्रीबद्दल. पण अभिज्ञा आणि रेश्मा यांची एकमेकींच्या आयुष्यात दहा वर्षापूर्वीच एन्ट्री झालीय आणि ती म्हणजे लगोरी या मालिकेच्या निमित्ताने. पण ही मालिका संपल्यानंतर दोघींना एकत्र काम करण्याची संधी मिळालीच नाही. लगोरीने निरोप घेतल्यानंतर अभिज्ञा देवयानी मालिकेच्या सिक्वेलमध्ये दिसली आणि त्यानंतर खुलता कळी खुलेना या मालिकेतील तिची खलनायिकाही गाजली. अभिज्ञाला ग्रे शेडच्या भूमिका जास्त चांगल्या शोभतात अशा प्रतिक्रिया तिला आल्या होत्या. अभिज्ञानेही चाहत्यांचे मत जास्तच मनावर घेत तुला पाहते रे या मालिकेत मायरा ही भूमिकाही ग्रे शेड असलेलीच केली. अभिज्ञाचा मालिका आणि डान्स शो प्रवास चांगलाच सुरू होता. आजकाल कोणतीही मालिका संथ होतेय असं लक्षात आलं की त्यात नवं पात्र आणून रंगत आणायची हे समीकरणच झालं आहे. रंग माझा वेगळा या मालिकेतही ही ट्रीक वापरली जाणार असून त्यामध्ये अभिज्ञा तनुजा भारद्वाजच्या रूपात दिसणार आहे.

लगोरीच्या निमित्ताने सेटवर अभिज्ञा आणि रेश्मा भरपूर दंगामस्ती करायच्या. अनुजा साठे, ज्ञानदा चेंबूरकर, दीप्ती लेले यादेखील लगोरीच्या मैत्रीग्रुपमध्ये होत्या. या मालिकेत रेश्मा पूर्वाच्या भूमिकेत तर अभिज्ञा मुक्ताच्या भूमिकेत होती. मधल्या काळात रेश्मा आणि अभिज्ञा त्यांच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याने दोघींची फारशी भेट होत नव्हती. पण आता मालिकेच्या सेटवर त्यांची भेट होणार आणि लगोरी मालिकेच्या आठवणींना उजाळा मिळणार या विचाराने रेश्मा आणि अभिज्ञा भलत्याच खुश आहेत. आता रंग माझा वेगळा मालिकेत अभिज्ञा साकारणारी तनुजा आणि नायिका दीपा यांच्यात काय नातं आहे हे माहिती नाही. त्यामुळे ऑनस्क्रीन त्यांची गट्टी जमणार की खुन्नस वाढणार हे मालिकेत दिसेलच. पण ऑफस्क्रीन मात्र रेश्मा आणि अभिज्ञा धमाल करण्यासाठी तयार झाल्या आहेत.

अभिज्ञा अभिनेत्री, डान्सर आहे तशी ती एक फॅशन डिझायनरही आहे. अभिज्ञा आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी एकत्रित सुरू केलेला तेजाज्ञा हा फॅशन ब्रँडही लोकप्रिय आहे. अभिज्ञाला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. मालिकेत नवी एन्ट्री घेण्याचा अभिज्ञाचा हा काही पहिला अनुभव नाहीय, देवयानी मालिकेत अभिज्ञाने अशी मालिकेच्या मध्यावर एन्ट्री घेत मालिकेला रंजक बनवले होते. रंग माझा वेगळा या मालिकेतही अभिज्ञाची एंट्री मालिकेला नवा रंग देईल असा विश्वास तिच्या चाहत्यांना वाटतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER