कॉलेज लाईफ जगायचं राहूनच गेलं

Pallavi Joshi

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्या कॉलेजचे मोरपंखी दिवस हे आयुष्यभर लक्षात राहण्यासारखे असतात. शाळेच्या वेळापत्रकातून बाहेर पडत मोकळे आयुष्य कॉलेजमध्ये जगता येत असते. आयुष्याच्या टप्प्यावर कोणी कुठेही गेलं तरी त्याचं मन मात्र बहिणाबाईंच्या कवितेसारखं कॉलेजमध्ये घुटमळत असतं. पण अनेकांच्या आयुष्यात असेही होते की, कामाच्या निमित्ताने किंवा जबाबदारी लवकर अंगावर पडल्याने कॉलेज जीवन जगायचं राहून जातं. अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) हिनेदेखील हीच खंत एका मुलाखतीत शेअर केली. कॉलेज लाईफ जगता आलं नाही याची मात्र आजही यशाच्या इतक्या टप्प्यावर तिला आठवण येते.

ज्या काळामध्ये आजसारख्या मालिका चार-पाच वर्षे चालत नव्हत्या. अशा काळामध्ये १३ भागांची मालिका असायची. या काळामध्ये अभिनेत्री पल्लवी जोशीचा मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर अभिनय क्षेत्रामध्ये प्रवेश झाला. पल्लवी दहावीत असल्यापासूनच मालिकांमध्ये काम करायला लागली. आणि जेव्हा तिची दहावी झाली तेव्हा तिच्या हातात खूप मालिकांच्या ऑफर्स आल्या होत्या.

पल्लवी सांगते, ‘एक कहानी’ ही मालिका त्या काळात मी केली होती. ही वेगवेगळ्या छोट्या छोट्या कथांवर आधारित होती. ‘जंगली बुटी कथा’ करण्याची संधी मला मिळाली. मी तेव्हा नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. दहावी झाल्यानंतर मला कॉलेजमध्ये जायला मिळणार या आनंदात मी होते; पण त्याच दरम्यान मला मालिकाबाबत विचारण्यात आलं. अभिनयाची आवड सुरुवातीपासूनच होती आणि त्यामुळे कामं येत राहिली. त्या मालिकांचे एपिसोड कमी असले तरी महिन्यातील २२ दिवस शूटिंग असायचे.

त्यामुळे मला कॉलेज लाइफ एन्जॉय करणं शक्य नव्हतं. आजची मुले एन्जॉय करतात ते मी बघते. मालिकांमध्ये, सिनेमांमध्ये कॉलेजचे चित्र दाखवले जाते.  ते बघितल्यानंतर मला नेहमी असं वाटतं की मी सगळं काही मिळवले; पण हे मोरपंखी दिवस जगायचं राहून गेलं.

ही बातमी पण वाचा : कॉलेजमधलं प्रेम लॉकडाऊनमध्ये झालं लॉक

रंगभूमीपासून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या पल्लवी जोशीने कॅमेऱ्यामागे लेखनाची धुरादेखील सांभाळली आहे. बालकलाकार म्हणून पल्लवी जोशीचा चेहरा लोकप्रिय झाला होता. मोजके आणि नेटके काम करत पल्लवीने तिचा एक वेगळा चेहरा अभिनय क्षेत्रामध्ये दाखवून दिला. अत्यंत चोखंदळ काम करणारी अभिनेत्री अशी तिची मराठी , सिनेमा, मालिका या तिन्ही क्षेत्रांमध्ये ओळख आहे.

सा रे ग म प या प्रसिद्ध शोच्या निवेदिका म्हणूनदेखील पल्लवी जोशी घराघरांत पोहचली आणि तिने पसंतीची पावती मिळवली. गायिका असल्यामुळे आणि गाण्याच्या विषयातील सखोल ज्ञान असल्यामुळे सारेगमप हा शो तिच्या निवेदनाच्या जोरावर लोकप्रिय बनवून दाखवला. बऱ्याच वर्षांनंतर ती ‘ग्रहण’ या दैनंदिन मालिकेत दिसली. तिचा अभिनय चांगला असूनही या मालिकेची भट्टी फारशी न जमल्याने ही मालिका फारशी छोट्या पडद्यावर तग धरू शकली नाही. मात्र या मालिकेच्या निमित्ताने पल्लवी जोशीचे पुन्हा एकदा टीव्ही माध्यमात चाहत्यांनी स्वागत केले होते. तशी पल्लवी ही सोशल मीडियावर फार ॲक्टिव्ह नसली तरी अभिनय आणि लेखन या क्षेत्रातही सतत प्रयोगशील काम करत आहे.

बालकलाकार म्हणून सुरुवात झालेली तिची कारकीर्द अत्यंत जोमाने सुरू राहिली; मात्र या सगळ्या व्यापात कॉलेजचे मोरपंखी दिवस जगायचे राहून गेले ही खंत आजही तिच्या ओठावर येते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER