उघडणार कॉलेजचे दार? २० जानेवारीचा मुहूर्त

Indian College door to open

राज्यात सध्या काही ठिकाणी शाळा सुरू आहेत, काही ठिकाणी बंद आहेत. शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याचा आदेश दिला असला तरी काही शाळांमध्ये अजूनही विद्यार्थी जातच नाहीत. काही ठिकाणी अत्यंत कमी उपस्थितीत शाळा सुरू आहेत. आता राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा उच्च शिक्षण विभागाचा मानस आहे. ही महाविद्यालये ५० टक्के विद्यार्थी उपस्थितीत सुरू करण्याबाबतचा निर्णय येत्या २० जानेवारीपूर्वी घेण्यात येईल, असे सूतोवाच उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी केले.

सामंत यांनी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी आपण चर्चा करू आणि २० जानेवारीपर्यंत महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. प्राध्यापक भरती, महाविद्यालयांचे प्रश्न, प्रवेश प्रक्रियांमधील अडथळे या आणि अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी फेसबुक पेजवरून विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून महाविद्यालये सुरू केली जातील.

राज्यातील खासगी अनुदानित महाविद्यालयांची प्राचार्यपदे मोठ्या प्रमाणात सध्या रिक्त आहेत. अशी २६० पदे भरण्यास उच्च शिक्षण विभागाने अलीकडेच परवानगी दिली आहे. आता इतर पदे भरण्याचा निर्णयही लवकरच घेण्यात येईल, असे सामंत यांनी सांगत दिलासा दिला.

मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत विद्यालय स्थापन करण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने मागेच केली होती. या विद्यापीठाचे स्वरूप कसे असेल याचा अभ्यासपूर्ण अहवाल सादर करण्यासाठी प्रख्यात संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ जणांची समिती नेमण्यात आली आहे.

नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची कक्षा रुंदावण्यात येणार आहे. या विद्यापीठाची जिल्हास्तरीय, परराज्यात आणि सीमाभागातही केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सामंत यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम आदिवासी भागात एक मॉडेल कॉलेज उभारले जाईल आणि गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठात अत्याधुनिक डेटा सेंटर उभारले जाईल, असे त्यांनी सांगितले.

लॉच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या होत्या. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रम आहे. म्हणून लॉच्या प्रवेश प्रक्रियेची मुदत येत्या सोमवारी आणि मंगळवारी असे दोन दिवस वाढविण्यात येत असल्याचे सामंत यांनी जाहीर केले. पॉलिटेक्निक आणि तंत्र विभागाच्या सगळ्या प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढविण्याची मागणी होती. त्यानुसार १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER