
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा मार्च महिन्यात नाशिकमधे घेतले जाणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी जगविख्यात खगोलसंशोधक आणि विज्ञानलेखक जयंत नारळीकर (Science writer Jayant Narlikar) यांच्या नावाचा विचार केला जात आहे आणि त्यासाठी आपल्या काही अटींसह नारळीकर सर तयार आहेत, अशा आशयाचे वृत्त प्रसारित झाले आहे. त्या वृत्तात जयंत नारळीकर यांच्या पत्नी मंगला नारळीकर यांनी याबाबतच्या प्रस्तावाला होकार असल्याचे सांगितल्याचे नमूद करण्यात आले आहे. होकार देतानाच प्रकृतीच्या कारणाने नारळीकर सर संमेलनाच्या तीनही दिवसांच्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नाहीत पण उद्घाटन समारंभात संमेलनाध्यक्षपदाची सूत्रं हाती घेणं आणि अध्यक्षीय भाषण करणं, हे शक्य आहे. त्याशिवाय संमेलनात त्यांची ऑनलाइन मुलाखत घेतली जाऊ शकते पण तीनही दिवसांच्या संमेलनातल्या कार्यक्रमांवर त्यांनी टिप्पणी करणे त्यांना शक्य होणार नाही, हेही डॉ. मंगला नारळीकर यांनी स्पष्ट केले आहे.
साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, त्याची निवडणूक त्यातले राजकारण, साहित्य परिषदेच्या, साहित्यमहामंडळाच्या घटक संस्था, त्यातले सभासद, मतदार हे सारे लक्षात घेतले तर नारळीकर सर प्रचलित पद्धतीत निवडणूक लढवायला तयार होतील, असं वाटत नाही. त्यांना बिनविरोध संमेलनाध्यक्षपद देता आले तर ती योग्य गोष्ट होईल आणि तसे करतानाही त्यांच्या अटी स्वीकारल्यानेही ना सहित्य महामंडळाचे काही बिघडेल ना साहित्य रसिकांचे. पण संमेलनाच्या इतिहासात शंभर वर्षात न झालेली गोष्ट घडेल आणि ती म्हणजे विज्ञानाच्या मूलभूत संशोधनाच्या क्षेत्रात जागतिक दर्जाची कामगिरी बजावून विज्ञानप्रसाराच्या क्षेत्रातही मराठी भाषेतून जागतिक पातळीवर दखल घेतले जाईल, असे काम केलेल्या एका संशोधक लेखकाला संमेलनाध्यक्षपदाचा मान मिळेल. त्यासाठी तरी नारळीकर सरांच्या अटी स्वीकारून त्यांना हा मान द्यायला हवा.
संमेलनाध्यक्षाने हे करायचे नसते, ते करायचे नसते. संमेलनाध्यक्षाने सर्व शहरांमधे जाऊन तिथल्या साहित्य संस्थांच्या वतीने केले जाणारे सत्कार स्वीकारत साहित्य पताका तेथे न्यावी, ही अपेक्षाही नारळीकर सर पूर्ण करतील का, याविषयी शंकाच वाटते. एक तर निव्वळ सत्कार समारंभ किंवा पुरस्कार वितरण अशा कार्यक्रमांची निमंत्रणे नारळीकर सर आवर्जून नाकारत असत. त्याऐवजी मला व्याख्यानाला बोलवा कारण सत्कार समारंभ किंवा पारितोषिक वितरण या कार्यक्रमात उपस्थितांचा मूड विचार ऐकून घेण्याचा नसतो तर केवळ सेलिब्रेशनचा असतो. त्यामुळे मला व्याख्यानाला बोलवा त्याद्वारे विज्ञानप्रसार होईल, ही भूमिका नारळीकर सरांनी आयुष्यभर जपली आहे.
संमेलनाच्या निमित्ताने होणारा अध्यक्षीय निवडणुकीचा धुरळा आता थांबायला हवा. माणूस म्हटला की राजकारण आलेच, यापेक्षाही माणूस त्यातही मराठी माणूस म्हटला तर तो किमान सुसंस्कृत असतो, हेही सिद्ध करायची वेळ आली आहे. त्याद्वारे ज्या बिनविरोध निवडीतून संमेलनाध्यक्षपदालाही मान मिळेल, अशी नावं, साहित्यिक यापूर्वीही निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे त्या पदापासून वंचित राहिले होते, ती गोष्ट टळू शकेल. अर्थात, यापूर्वी असे जबरदस्त लेखक कवी या पदापासून वंचित राहिले म्हणण्यापेक्षा संमेलनाध्यक्षपद त्या थोरांनी न भूषविल्याने सहित्य रसिकांसाठी आणि एकूणच संस्कृतीच्या पातळीवरही ती फार स्वागतार्ह बाब झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर नारळीकर सर संमेलनाध्यक्ष व्हावेत, असे आवर्जून वाटते. सरांचा जन्म १९३८ सालचा आणि संमेलनाच्या वेळी ८१ वर्षांचे सर अध्यक्षीय भाषण त्यांच्या नेहमीच्या शैलीत करतीलच पण त्यांच्या मुलाखतीच्या निमित्तानेही त्यांचे विज्ञानविषयक विचार, साहित्याकडे ते कसे पाहतात, ही दृष्टीही इतरांसाठी मार्गदर्शक ठरेल. बनारससारख्या शहरात चंद्रकांतासारख्या हिन्दी साहित्यासह इंग्रजीतल्या पी जी वुडहाऊससारख्या आणि मराठीतल्या चिं वि जोशींसारख्या लेखकाच्या निर्विष विनोदावर भरणपोषण झालेले नारळीकर सर भाषा व्यवहारात एक प्रकारचं मार्दव, विनोदबुद्धी ज्ञानाची प्रखरता हे तर आणतीलच पण चुकीच्या प्रथांना संयत पण ठाम विरोध करण्याची त्यांची पद्धत हेही संमेलनापासूनच लोकांना लक्षात येईल, आचरणात आणता येईल. थोरांचे वागणे इतरांसाठी अनुकरण असते, त्याने समाज व्यवहारही सुधारत असतात. हे सारे शक्य आहे आणि ते संबंधितांनी शक्य करून दाखवायला हवे.
शैलेन्द्र परांजपे
Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला