कोकोनंतर टेनिस जगतात आल्यात आणखी दोन १५ वर्षांच्या खेळाडू

Katrina Scott - Coco Gauff

आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये (Tennis) कमी वयाच्या खेळाडू ही काही नवीन गोष्ट नाही. अमेरिकेची अवघ्या १६ वर्षांची कोको गौफ्फ (Coco Gauff) ही मैदान गाजवतेय, तसे मैदानाबाहेरही आपल्या विचारांनी तिने आपल्या वयापेक्षा ती बरीच प्रगल्भ असल्याचे दाखवून दिले आहे. सध्या सुरू असलेल्या यू .एस. ओपन टेनिस (US Open Tennis) स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत कोको पराभूत झाली; मात्र तिच्याच वयाच्या म्हणजे आणखी एका १६ वर्षीय खेळाडूने यूएस ओपनच्या पदार्पणात चमक दाखवली आहे. ही खेळाडू म्हणजे अमेरिकेची कैटरीना स्कॉट (Katrina Scott).

वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळालेल्या या खेळाडूने दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले आहे आणि तिचा सामना आता २२ व्या मानांकित अमांडा अनिसीमोव्हाशी आहे. तिने पहिल्या फेरीत रशियाच्या नतालिया विखल्यानत्सेव्हावर विजय मिळवला.

क्रमवारीत कैटरीना ६३७ व्या स्थानी आहे तर नतालीया १३१ व्या स्थानी आहे. कैटरीनाचीच जिवलग मैत्रीण रॉबीन माँटगोमेरी हीसुद्धा १५ वर्षांचीच आहे. तिलासुद्धा वाईल्ड कार्डने संधी मिळाली. ती यंदाच्या यू. एस. ओपनमधील सर्वांत कमी वयाची खेळाडू ठरली. तिचे पदार्पण मात्र अपयशी ठरले. तिला युलिया पुतिनत्सेवा हिने ६-१, ६-३ असे पराभूत केले. तिने ग्रँड स्लॅम स्पर्धेत पहिल्यांदाच खेळताना शांत डोक्याने चांगला खेळ केला, मार्ग काढण्यात ती यशस्वी ठरली; पण हा तिचा सर्वोत्तम खेळ नव्हता असे तिचे प्रशिक्षक डेव्हिड कास यांनी म्हटले आहे. कोरोनामुळे बऱ्याच खेळाडूंनी यंदाच्या स्पर्धेत खेळायचे टाळल्याने कैटरीनाला संधी मिळाली.

कैटरीनाची आई लेना स्कॉट ह्या इराणमध्ये बॉले नृत्यांगना होत्या. आता कर्करोगावरील उपचारासाठी त्या अमेरिकेत आल्या आहेत. आईप्रमाणेच कैटरीनासुद्धा बॉले नृत्यांगनाच बनली असती. लेना यांनी तिला बालपणी बॉलेचे धडेसुद्धा दिले होते. पण बॉलेत कैटरीनाने रस दाखविला नाही तेव्हा त्यांनी तिला बॉलेशीच मिळत्याजुळत्या फिगर स्केटिंगकडे वळवले. फिगर स्केटिंगमध्ये ती रमलीसुद्धा होती; पण एके दिवशी आई तिला फिगर स्केटिंग क्लासच्या ठिकाणी घ्यायला आली नाही तेव्हा ती मैत्रिणीसोबत टेनिस कोर्टवर गेली; कारण ती मैत्रीण टेनिस खेळायची आणि कैटरीनाची दिशाच बदलली. ती टेनिस खेळू लागली. तिचे वडील डेव्हिड व आई लेना यांनीसुद्धा टेनिस गंभीरतेने घेतले आणि १४ वर्षांआतील वयोगटात ती चमकदार खेळ करू लागली.

गेल्या वर्षी सोन जोस येथे ती आपला पहिला स्पर्धात्मक सामना टिमीया बाबोसविरुद्ध खेळली आणि लोकांना तिचा खेळ आवडला. त्यानंतर ती कास टेनिस अकादमीत आली आणि आता कास यांच्या मार्गदर्शनातच ती यू. एस. ओपन खेळतेय. कास यांनी सहा महिने (कोरोनामुळे झाले नऊ महिने) तिला खेळापासून लांबच ठेवत तिची मानसिक तयारी करून घेतली. त्याचा परिणाम तिच्या खेळात दिसून येतोय. कोको गौफ्फप्रमाणेच कैटरीनानेसुद्धा सामाजिक प्रश्नावर आवाज उठवला आहे. सामन्यासाठी आणि सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेलाही ती ब्लॅक लाईव्हज मॅटरचा टी-शर्ट घालून आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER