वरळी सीफेस येथील समुद्रातील भराव कार्य थांबवा, आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी

Aditya-Thackeray-Koliwada-fishermen

मुंबई : वरळी सीफेस येथील समुद्रातील भराव कार्य थांबविण्याची मागणी वरळी कोळीवाडा येथील कोळीबांधवांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मागील एका महिन्यापासून याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना भेटण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत, मात्र, त्यांच्या कार्यालयाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचे कोळीबांधवांनी म्हटले आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघाचे आमदार आहेत, हे येथे उल्लेखनीय.

वरळी कोस्टल रोड प्रकल्पाशी निगडित या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कोळी संघटनेने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिले होते.

शेतकऱ्यांना कर्जमाफी यादीची प्रतिक्षा

सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल येईपर्यंत या कार्यास स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. भराव कार्यामुळे मासेमारी विभागावर परिणाम होत आहे. त्यामुळे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याचे वरळी-कोळीवाडा नाखवा मत्स्य सहकारी सोसायटीने म्हटले आहे. याबाबत संस्थेने भराव कामाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. आपला कोस्टल रोड प्रकल्पाला विरोध नाही, मात्र, जैवविविधता आणि कोळीबांधवांची उपजीविका या दोन्ही बाबींचे संरक्षण करून अधिकार्‍यांनी पर्यायी मार्ग काढावा, असे संस्थेने म्हटले आहे.

१० जानेवारी रोजी एका कार्यक्रमानिमित्त आदित्य ठाकरे हे वरळी-कोळीवाडा येथे आले होते. त्यावेळी त्यांचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्यात आले होते. त्यांनी आपल्याला पत्र मिळाल्याचे यावेळी सांगितले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून बैठक बोलविणार असल्याची माहितीही त्यांनी दिली होती, असे कोळीवाडा येथे राहणारे नीलेश पाटील म्हणाले.

कोस्टल रोड प्रकल्प हा १२ हजार कोटींचा असून, यामध्ये बांद्रा-वरळी समुद्रजोड रस्त्याच्या वरळी टोकाला प्रिंसेस स्ट्रीट उड्डाण पूल जोडण्यात येणार आहे. या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने मागील वर्षी जूनमध्ये स्थगिती दिली होती. त्यानंतर ही स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने डिसेंबरमध्ये हटविली. आता येत्या एप्रिल महिन्यात या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

दरम्यान, भराव कार्यामुळे पर्यावरणाची हानी होईल, या भीतीने दक्षिण मुंबईतील अनेक रहिवाशांनीही राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.