सरकार पाच वर्षं टिकवायचं आहे, उद्धव ठाकरेंशी समन्वय ठेवा; मंत्र्यांना शरद पवारांच्या सूचना

Sharad Pawar

मुंबई :- “सरकार पाच वर्षं टिकवायचं आहे. वादग्रस्त वक्तव्ये टाळा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी योग्य समन्वय ठेवा- अशा सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांना दिल्या आहेत.

पवारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक बोलावली होती. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. या बैठकीत शरद पवारांनी मंत्र्यांना उद्धव ठाकरेंशी समन्वय साधण्याचा आणि वादग्रस्त वक्तव्ये टाळण्याचा सल्ला दिला.

मुंबईतील यशवंतराच चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांशी चर्चा केली. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे यांच्यासह १६ मंत्री उपस्थित होते.