३१ मार्चनंतर सहकारी संस्थांच्या निवडणुका ; ठाेस निर्णयाची प्रतिक्षा

सहकारी संस्था निवडणूक

पुणे : कोरोना (Corona) आणि शेतकरी कर्जमाफीमुळे रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याची प्रक्रिया सोमवारपासून (दि.१८) सुरु करावी असे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने (State Co-operative Election Authority) दिले आहेत. दरम्यान, सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मार्चनंतर घ्याव्यात, असे नवे आदेश राज्य सरकारकडून येण्याची शक्यता असल्याने सहकार विभागच संभ्रमावस्थेत आहे. दोन दिवस प्रतिक्षा करुनच निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

निवडणुकीस पात्र असलेल्या राज्यातील सुमारे ४५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ डिसेंबर २०२० पर्यंत स्थगित करण्यात आल्या होत्या. निवडणुकीबाबत शासनाचा पुढील आदेश न आल्याने स्थगित केलेल्या संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरु करावी, ज्या टप्प्यावर निवडणुका स्थगित झाल्या होत्या, त्या टप्प्यापासून पुढे निवडणुका घ्याव्यात. निवडणुकांबाबत सोमवारपासून आराखडा तयार करण्याची सुचना राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सचिव यशवंत गिरी यांनी मंगळवारी (दि.१२) केली होती. निवडणुका होणार असल्याने कार्यकर्त्यांत उत्साही वातावरण आहे. निवडणुकीची तयारी नेमकी कधी पासून सुरू करायची ? याबाबत सहकार विभाग मात्र संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून आले. राज्य शासनाचे नवे आदेश येतील, अशी चर्चा सहकार विभागात आहे. बुधवारी रात्री उशीरापर्यंत असे आदेश आले नव्हते.

सहकारी कायद्यानुसार जास्तीजास्त वर्षभर निवडणुका पुढे ढकलता येतात. त्यानंतर नवा कायदा करावा लागतो. राज्य सरकारने मागील अधिवेशनात ३१ मार्चनंतरच सहकारी संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, याबाबतची नोट विधीमंडळात मंजूर करुन घेतली आहे. मात्र याबाबत अध्याप निर्णय झालेला नाही. राज्यातील कोल्हापूर महापालिकेसह अजून काही महापालिकेंच्या निवडणुका झाल्यानंतरच सहकारी संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात, असा मतप्रवाह आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे बोलले जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER