सहकार आयुक्त सतीश सोनी निलंबित

Mumbai Mantralaya

मुंबई : सहकार आयुक्त सतीश सोनी यांना निलंबित करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील हलगर्जीपणा त्यांना भोवला आहे. शेतकरी कर्जमाफीची माहिती देणार्‍या वेबसाईटच्या लिंकवर क्लीक केल्यावर कॅन्डी क्रश हा गेम ओपन होत होता. ही लिंक सहकार विभागाकडून शेतकर्‍यांना एसएमएसद्वारे पाठवली गेली होती. राज्य सरकारने ही कारवाई केली आहे.

लिंकवर क्लिक केल्यानंतर कॅन्डी क्रश गेम ओपन होत होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. यामुळे शासनाची सर्वच स्तरातून कडाडून टीका झाली. राज्य शासनाने याची गंभीर दखल घेत सोनी यांना यासाठी जबाबदार धरत त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. किसान पोर्टलवरून शेतकरी कर्जमाफीची लिंक शेतकऱ्यांना एमएमएसद्वारे पाठवण्यात आली होती.

प्रभारी सहकार आयुक्त सतीश सोनी व निबंधक, सहकारी संस्था, पुणे, यांनी सदर कामाचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतक-यांना अशा प्रकारची लिंकची सुविधा उपलब्ध करून देताना चुकीची लिंक जाऊ नये याबाबत विशेष लक्ष देऊन काळजी घ्यायची होती. पण तसे न करता त्यांनी एकाच दिवशी दोन प्रकारची वेगवेगळी पत्रे तयार केली. एका पत्रात चुकीची युआरएल टाकून कृषी आयुक्तांना सदर पत्र ई-मेलने पाठवून त्यांची दिशाभूल केली आणि नंतर दुस-या पत्रावर कृषी आयुक्तांची पोच पावती घेतली.

सतीश सोनी यांच्याकडून ही चूक अनावधानाने झाली नसून, हेतुपुरस्सर केली असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले आहे. चुकीच्या लिंकचा उल्लेख असलेले दिनांक 7/1 /2020 रोजीचे पत्र कृषी आयुक्तांना दिल्यामुळे योजनेची बदनामी तर झालीच, शिवाय सदर बाब निस्तारण्यासाठी शासनाला विविध पातळीवर खुलासे करावे लागले. सहकार आयुक्तांना सोपविलेल्या कामामध्ये त्यांनी अवलंबिलेला अक्षम्य हलगर्जीपणा, दुर्लक्ष व बेजबाबदारपणा याबाबत त्यांच्या कृती विषयी चौकशी करणे आवश्यक असल्याचे शासनाच्या आदेशात म्हटले आहे.