
मुंबई : ‘लोक मास्क घालत नाहीत. आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे. अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिलेत.
लॉकडाऊन (Lockdown) पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे, अशा आक्रमक शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाव्य लॉकडाऊनविषयी इशारा दिला.
कोरोना संसर्ग आटोक्यात आला असे गेल्या काही दिवसात वाटत होते. लस आल्याने सर्वांच टेन्शन कमी झाले होते. मात्र करोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली. खबरदारी म्हणून महाराष्ट्रात पुन्हा कडक निर्बंध लादण्यात येतील, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले होते. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील उल्लेखित प्रतिक्रिया दिली.
कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या करा, एकेका रुग्णांचे किमान २० तरी संपर्क शोधलेच पाहिजेत, असे ठाकरे यांनी सांगितले. ज्या व्यावसायिक संस्था, संघटना लॉकडाऊन उठवण्यासाठी येत होत्या त्या सर्व संबंधित संस्था, संघटना यांच्याशी परत एकदा बोलून एसओपीची काटेकोर अंमलबजावणी होईल याची खात्री करून घेण्याची सूचना त्यांनी केली.
अकोल्यात प्रतिबंध
अकोला जिल्ह्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालय, शिकवण्या बंद करण्यात आल्या आहेत. धार्मिक, राजकीय कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे.
वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महाविद्यालये बंदचा आदेश दिला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला