मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे २५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्यासाठी विनंती!

Maharashtra Today

मुंबई :- कोरोना संसर्गाचा विळखा तरुण पिढीलाही बसत आहे. यांनादेखील विषाणूपासून वाचवणे आवश्यक आहे. त्यामुळे २५ वर्षांपुढील (above-25-years-of-age) सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस (Vaccine) द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्राद्वारे केली आहे. लसींचे वाढीव डोस महाराष्ट्राला मिळावेत, असेही या पत्रात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

तरुण वर्गाला लस गरजेची
मोठ्या संख्येने तरुण वर्ग विशेषत: जो घराबाहेर कामाला जातो, त्याला लस मिळाल्यास रुग्णसंख्या कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे. या परिस्थितीसंदर्भात महाराष्ट्र सरकार ठोस पावले उचलत आहे. मुख्यमंत्री पत्रात म्हणतात की, “राज्याने नेहमीच पारदर्शकपणे कोरोनाविषयी माहिती मांडली आहे. चाचण्यांचा वेगही वाढवला आहे. प्रत्येक कोरोना रुग्ण बरा झालाच पाहिजे, या निर्धाराने आम्ही उपाययोजना करीत आहोत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक हानिकारक असलेल्या विषाणूला रोखण्यासाठी आम्ही ‘ब्रेक दि चेन’ या मोहिमेच्या माध्यमातून कडक निर्बंध लावले आहेत.

मात्र यात जीवनावश्यक वस्तू व सेवा, उत्पादन क्षेत्र, वाहतूक सुरूच राहील आणि कोविडसाठी आरोग्याचे नियम सर्व जण पाळतील, अशी कार्यपद्धती ठरवली आहे.” लसीकरण वेग वाढविण्याचा महाराष्ट्राचा प्रयत्न आहेच, पण त्यासाठी केंद्राने जादा डोस द्यावेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्री म्हणतात की, “मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर (Nagpur) या सर्वाधिक संसर्ग असलेल्या सहा जिल्ह्यांसाठी केवळ तीन  आठवड्यांत  ४५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची आमची तयारी आहे. याकरिता दीड कोटी डोस मिळावेत.” केंद्र सरकारच्या साहाय्याने आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नाने या संसर्गाच्या लाटेवर मात करता येणे शक्य होईल. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी आधी जीवन, मग उपजीविका अशा प्राधान्याने आणि विज्ञानाच्या उपयोगाने देशाला एका नव्या सामान्य परिस्थितीत आणता येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

ही बातमी पण वाचा : ‘फडणवीस आणि राज ठाकरेंच्या आश्वासनानंतरच मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊन जाहीर’ – शिवसेना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button