आरे कारशेड निर्मितीला स्थगिती देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय दुर्दैवी : देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis And Uddhav Thackeray

मुंबई : आरे कारशेड निर्मितीसंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला निर्णय दुर्दैवी असल्याचे म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कारशेड निर्मितीच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘मा. सर्वोच्च न्यायालय आणि मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे.

मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येते. शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच’, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात अन्य भाजप नेतेही आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

जपानच्या जायकाने अत्यल्प व्याजदराने सुमारे १५,००० कोटी रुपयांचे कर्ज या मेट्रो प्रकल्पासाठी दिले होते. अशा पद्धतीच्या निर्णयांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि १५ वर्षांत आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुढील सूचना मिळेपर्यंत कारशेडचे कोणतेही काम होणार नाही, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारताच सचिवांशी चर्चा केली त्यावेळी दिल्या. आरेत आता झाडाचे पानही तोडले जाणार नाही, मुंबईकरांसाठी मेट्रोचे काम सुरूच राहील, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. रातोरात आरेमधील अडीच हजारांपेक्षा जास्त झाडे कापण्यात आल्यानंतर कारशेडचे काम सुरू करण्यात आले. मोठ्या विरोधानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी कारशेड आरेमध्येच उभारण्याचा निर्णय रद्द केला नव्हता. या मेट्रो मार्गाचे काम प्रगतिपथावर असले तरी कारशेडशिवाय हा प्रकल्प अपूर्णच असणार आहे. त्यामुळे कारशेडचे नेमके काय होणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

आशिष शेलारांचीही टीका

भाजप आमदार आणि माजी मंत्री आशिष शेलार यांनीही या निर्णयावर टीका केली. ‘धनुष्यबाणा’च्या ‘हातात’ ‘घड्याळ’ बांधले जाते तेव्हा, विकासाचे काटे आणि चक्र उलटच फिरणार! ७० टक्के काम पूर्ण झालेल्या मेट्रो प्रकल्पातील कारशेडला स्थगिती देणे हा निर्णय मुंबईकरांसाठी अत्यंत घृणास्पद… मुंबईकरांच्या प्रश्नांवर असे राजकारण बरे न्हवे. ’ असे ट्विट शेलारांनी केले.