पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने मुख्यमंत्री चिंताग्रस्त

CM Uddhav Thackeray

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा (Corona) वाढता संसर्ग ही चिंतेची बाब आहे. मुंबई, ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा, सांगली, कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारा आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वसामान्य जनतेचा सहभाग होता. तसाच कोरोनामुक्तीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे. कोरोना दक्षता समित्या, स्वयंसेवी संस्था यांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज केले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील कोरोनाबाबतचा आढावा व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे घेतला. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, पुढच्यास ठेच मागचा शहाणा या म्हणीप्रमाणे कोरोना लढ्यात ज्या चुका यापूर्वी इतर काही जिल्ह्यांकडून झाल्या असतील त्या तुम्ही होऊ देऊ नका. इतर देश फक्त कोविड एके कोविडचा मुकाबला करत आहेत. आपल्याकडे गणेशोत्सव, मोहरम पार पडला. आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येतील. त्यातच पाऊस सुरू आहे. त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठे आहे. हा कसोटीचा काळ आहे. सुविधा कितीही उभ्या केल्या तरी शेवटी काही प्रमुख मूळ मुद्यांवर लक्ष केंद्रित  करा तर १५  दिवसांत चांगले परिणाम दिसतील. हे मुद्दे म्हणजे एकेका रुग्णामागचे जास्तीत जास्त संपर्क शोधा.

चेस द व्‍हायरस मोहीम अधिक गांभीर्यपूरक राबवा. कंटेन्टमेंट क्षेत्रात कडक नियम पाळा. चाचण्यांची क्षमता वाढवा. घरोघर सर्वेक्षणाला अधिक गती द्या. घरोघरी भेटी देऊन कुटुंबाच्या आरोग्याची चौकशी करणारी मोहीम राबविणार आहोत. यात घरातील कुणाला इतरही काही आजार आहेत का, त्यांचे आरोग्य कसे आहे, त्यांना न्युमोनिया सदृश्य काही लक्षणे आहेत का, घरात बाहेरून कुणी व्यक्ती आले आहेत का,मास्क व इतर शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन व्यवस्थित केले जाते का, याविषयी पूर्ण माहिती विचारली जाईल.

केवळ पश्चिम महाराष्ट्रातीलच नव्हे तर कोणत्याही जिल्ह्याला या कोरोना लढ्यात काही अडचण आल्यास किंवा काही कमतरता भासल्यास राज्य शासन संपूर्ण सहकार्य करणार. मात्र कुचराई करू नका, गाफील राहू नका. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आपापल्या जिल्ह्यांचा यावेळी कोरोनाबाबतचा सविस्तर आढावा दिला. पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनीही आढावा दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER