मुख्यमंत्री दोन जागांवर विधानसभा निवडणूक लढवणार?

Devendra-Fadnavis

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक भारी बहुतमांनी जिंकायच्याच, हा संकल्प घेऊन भाजपने तयारी सुरू केली आहे. दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन-नवीन चर्चा समोर येत आहे. त्याबरोबरच राजकीय वातावरणही तापत आहे. याच चर्चादरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासंदर्भात महत्वपूर्ण वृत्त समोर आले असून ते आगामी विधानसभा निवडणूक नागपूर आणि मुंबई अशा दोन ठिकाणाहून लढणार असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासाठी मुंबईतील एका मतदारसंघाची चाचपणीही करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यासाठी मुंबईतील मलबार हिल विधानसभा हा सुरक्षित पर्याय देण्यात आला आहे. हा पर्याय त्यांना मान्य झाल्यास मुख्यमंत्री नागपूर आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. भाजपचा बालेकिल्ला असलेला मलबार हिल मतदार संघाचे मुख्यमंत्र्यांनी नेतृत्व केल्यास काय होऊ शकते? असे मतही एका एजन्सीमार्फत जाणून घेण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांसाठी हा मतदार संघ योग्य मानला जात असून हा मतदार संघ आमदार मंगल प्रभात लोढा यांचा आहे. लोढा यांच्यावर मुंबई भाजप अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून यापुढे इतर जबाबदारीही देण्याबाबत विचार सुरु असल्याची माहिती आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीतील भरघोस यशानंतर आता भाजप राज्यातील विधानसभा निवडणूकीतही अभूतपूर्व विजय मिळविण्यासाठी कामाला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री राज्यात रथयात्राही काढणार असल्याची माहीती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. ‘एक बार शिवशाही सरकार’ आणि ‘अब की बार 220 के पार’ या टॅगलाइनसह रथयात्रा काढण्यात येणार आहे. ही रथयात्रा ऑगस्ट महिन्यात काढण्यात येणार असल्याचे पाटील म्हणाले होते. भाजप-शिवसेना 288 जागांच्या विजयासाठी जोरदार तयारी करत असल्याची माहिती आहे.