मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘व्हिक्टोरिया बग्गी’चे अनावरण

CM Uddhav Thackeray - Maharastra Today

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील वर्षा शासकीय सभागृहात पर्यटकांसाठी इलेक्ट्रिक व्हिक्टोरिया बग्गीचे अनावरण केले. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी बग्गीची माहिती घेतली आणि या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते बग्गीचालक युसूफ मुसा चोरडवाला, इरफान देसाई, अजीज खान, इस्माईल चोरडवाला यांना चाव्या प्रदान करून बग्गी मार्गस्थ करण्यात आल्या.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या उपक्रमाची माहिती जाणून घेतली. मुंबईव्यतिरिक्त पुणे, कोल्हापूर पर्यटनस्थळांवर अशी सुविधा गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईतील हेरिटेज स्थळे दाखवणे आणि प्रत्येक संबंधित स्थळांची माहिती पर्यटकांना मिळण्याची सुविधा या व्हिक्टोरिया गाडीत असेल.

उबो राईड्ज या कंपनीकडून बग्गी चालविण्यात येणार आहे. ४० व्हिक्टोरिया बग्गी टप्प्याटप्प्याने मुंबईत चालवण्यात येतील. पहिल्या टप्प्यात १२ दक्षिण मुंबईत सुरू होणार. या १२ बग्गींपैकी ६ बग्गी ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील ताज पॅलेस हॉटेलसमोरून सुटतील. तर उरलेल्या ६ बग्गी नरिमन पॉइंट येथून सुटणार. या बग्गींमधून सायंकाळी ४ पासून मध्यरात्री २ वाजेपर्यंत दक्षिण मुंबईची सफर करता येईल. घोडागाड्या बंद झाल्याने या व्यवसायातील सुमारे २५० बेरोजगारांना यात सामावले जाणार आहे.

ही बग्गी पर्यावरणपूरक लिथियम बॅटरीवर चालणारी आहे. बॅटरी चार्ज झाल्यावर ७० ते ८० किमीपर्यंत प्रवास होणे शक्य आहे. मुंबईनंतर ही सेवा जुहू, बँडस्टँड, ठाणे तलाव इत्यादींपर्यंत वाढविण्यात येणार आहे. ही बग्गी मुंबईबाहेरील पर्यटनस्थळांवरही वाढविली जाईल आणि मुंबईतील प्रमुख रेस्टॉरंट्सबरोबर करारही केले जातील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER