उद्धव ठाकरे यांना सीएए, एनपीआर व एनआरसी समजविण्याची गरज : काँग्रेस आक्रमक

नवी दिल्ली :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए)वरून घेतलेल्या भूमिकेवर काँग्रेस आक्रमक झाली आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सीएए, एनपीआर आणि एनआरसीबद्दल अधिक समजवण्याची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची शुक्रवारी भेट घेतली. यानंतर वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत उद्धव ठाकरेंनी सीएएमुळे कुणीही घाबरू नये, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारची भूमिका उचलून धरली. यामुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी आता काँग्रेसकडून प्रयत्न होताना दिसत आहे.

एनपीआर फाइल केले तर एनआरसीला रोखता येणार नाही, असे मनिष तिवारी म्हणाले. तसेच धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणे हे घनाबाह्य आहे, हे उद्धव ठाकरे यांनी लक्षात घेतले पाहिजे’, असे तिवारी यांनी सांगितले. ‘उद्धव ठाकरे यांना नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत अधिक समजावून सांगण्याची गरज आहे. आणि एनपीआरचा (राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी ) आधारच एनआरसी (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) आहे.

आता या वयात कसले व्हिजन बघायचे, ते काम नव्या पिढीकडे : शरद पवार

सीएएच्या विरोधात दिल्लीत आंदोलन सुरू असून, आंदोलकांना भडकविण्याचे काम कोण करीत आहे हे तुम्हाला ठाऊक आहे, अशा शब्दांत दिल्लीभेटीवर गेलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतचा आपला आक्षेप नोंदवला. ते म्हणाले होते की नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) कुणालाही देशाबाहेर काढण्यासाठी करण्यात आलेला नाही. ज्या लोकांनी सीएएविरोधी आंदोलन भडकविले आहे त्यांना त्याची जाणीव असायला हवी. सीएए, एनपीआर, एनआरसी या विषयांवर माझी पंतप्रधानांशी चर्चा झाली. हे तिन्ही मुद्दे समजून घेऊन मी माझी भूमिका स्पष्ट केली असल्याचे ठाकरे म्हणाले होते. एनपीआरच्या विषयावर आज ना उद्या सारी माहिती येईल आणि त्यातील आक्षेपार्ह रकाने आणि कलमे पाहून ते आम्हाला मान्य नाही असे आम्ही म्हणू शकतो, अशा शब्दात त्यांनी आपली या वादग्रस्त मुद्यांवर आपले म्हणणे मांडले.