फडणवीसही मुख्यमंत्री होते, विरोधी पक्ष सांगतो म्हणून गुन्हा दाखल करायचा नसतो हे त्यांनाही ठाऊक – मुख्यमंत्री

Devendra Fadnavis - CM Uddhav Thackeray
  • डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणी कोणी रस्त्यावर का येत नाही

मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) नेते, राज्याचे वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अकेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पुजा चव्हाण (Pooja Chavan) मृत्युप्रकरणात संजय राठोड यांचे नाव पुढे आल्यापासून विरोधकांनी सत्ताधा-यांवर दबाव वाढवला होता. अखेर राठोडांनी काल राजीनामा दिला. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मागील काही महिन्यांपासून राज्यात घाणेरडं राजकारण सुरू झालं आहे. तपास निःपक्षपातीपणे झाला पाहिजे, कोणी कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे. एखाद्याला लटकवायचंच आहे, त्याला आयुष्यातून उठवायचंच आहे, असाही तपास असता कामा नये. केवळ राजीनामा घेणं, हातात काही पुरावे असोत वा नसोत गुन्हा दाखल करून मोकळं होणं म्हणजे कुणाला न्याय देणं असं होत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधकांवर पलटवार केला तसेच, मुक्यमंत्र्यांनी खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणा बाबतही टीप्पणी केली व या आत्महत्या प्रकरणावर कोणी रस्त्यावर का उतरत नाही, असा थेट प्रश्न केला.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृह येथील मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले.

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिला असल्याचे सांगितले. संजय राठोड यांच्याविषयी कुणाचीही तक्रार नव्हती. मात्र विरोधकांकडून अधिवेशनच चालू द्यायचे नाही, असे गलिच्छ राजकारण करण्यात आले. तेव्हा केवळ नैतिकतेला धरून राठोड यांनी आपला राजीनामा दिला. राजीनामा स्वीकारल्यानंतर त्याच्या मागे उगाचच लटकवायचंच आहे अशा पद्धतीने आगपाखड चालली आहे ती बंद झाली पाहिजे.असे मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधी पक्ष सांगतो म्हणून गुन्हा दाखल करायचा असे नसते. त्यासाठी तपासाचा अहवाल यायला लागतो हे फडणवीस यांनाही माहीत आहे. तेही मुख्यमंत्री होते. तपास सुरू झाल्यानंतर अहवाल येणारच आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर वन खात्याचा कारभार माझ्याकडे आहे. त्यानिमित्ताने विधानसभेत मी किंवा त्या खात्याचे राज्यमंत्री त्यावर उत्तर देतील, असेही त्यांनी सांगितले.

तपास हा झालाच पाहिजे. पण हा तपास निःपक्षपातीपणाने केला गेला पाहिजे. जर कुणी त्याच्यात गुन्हेगार असेल, जर कुणी दोषी असेल. तर तो कोणी कितीही मोठा असला तर त्यावर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे अशी या सरकारची ठाम आणि स्पष्ट भूमिका आहे. पण काही घटना घडत आहेत की आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा. तपासाला तुम्ही दिशा देऊ शकणार नाही, तो निःपक्षपातीपणाने सुरू आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले.

ज्या क्षणी ही घटना आम्हाला कळली त्याच क्षणी आम्ही या घटनेची निःपक्षपातीपणाने चौकशी व तपासाचे आदेश दिले आहेत. पोलिसांना लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्याही सूचना करण्यात आलेल्या आहेत. त्यातून जे सत्य बाहेर येईल, कुणालाही पाठीशी घालणार नाही. जो कुणी त्यात आरोपी असेल, त्याला क्षमा होणार नाही. पण हे सगळं करत असताना नुसती आदळआपट करून, तपासाची दिशा भरकटून टाकायची. हा जो काही प्रकार आणि प्रघात घातला जातो आहे हा फार गंभीर आहे. अगोदर चौकशी नीट होऊ द्या. तपास नीट होऊ द्या. ही तपास यंत्रणा तीच आहे ज्यांच्यावर तुमचा अविश्वास आहे. तुमच्या काळातदेखील हीच तपास यंत्रणा होती,’ असा दाखलाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

तुमची सत्ता नाही म्हणून महाराष्ट्राची बदनामी करू नका

फडणवीसांचं समजू शकतो. समोर आलेलं चांगलं चित्र त्यांनी स्वतःच्या कर्माने त्यांनी भंग केलं. सरकार पडेल हाही भ्रम फोल ठरला, आमचं सरकार अधिक भक्कमपणे वाटचाल करतेय. महाराष्ट्राच्या हिताचं, विकासाचं स्वप्नं पुढे घेऊन जाताना इतर ठिकाणी कौतुक होतंय. पण तुमच्या मनात काही खदखदतंय ती खदखद जरूर काढा, पण कारण नसताना केवळ आपली सत्ता नाही म्हणून महाराष्ट्राची आणि सरकारची बदनामी करू नका. कारण स्वतःच्याच घरचा काळ अशी आपली नोंद इतिहासात होऊ देऊ नका, अशी समज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांना दिली.

देश विकायला काढणारे सरकार म्हणून तुमच्या सरकारची नोंद होईल!

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मला फुकटचा सल्ला दिला आहे. सत्तेत कोणी किती लाचारी स्वीकारली हे इतिहास लिहिलं जातं असे त्यांचे म्हणणे आहे. पण सत्ता आल्यानंतर एकतर खोटं बोलून सत्ता आणली. तसेच सत्ता आल्यानंतर खोटय़ाचे इमले रचले आणि देश विकायला काढला! देश विकायला काढणारे म्हणून तुमच्याही सरकारची नोंद होईल. तेव्हा आरोप करताना थोडेसे भान ठेवावे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मुलीच्या आईवडिलांचा तपास यंत्रणेवर विश्वास

मुलीचा जीव गेलाय तिच्या आईवडिलांचा आणि बहिणीचा तपास यंत्रणेवर, सरकारवर विश्वास आहे. ते सांगताहेत यात राजकारण आणू नका आणि हे लोक यात राजकारण आणत आहेत यासारखं दुर्दैव नाही. प्रत्येक पाऊल टाकताना गांभीर्याने टाकावं लागतं. त्याच्यामध्ये उथळपणा असता कामा नये. कुणाचाही जीव महत्त्वाचा असतो. घटना दुर्दैवी आहे, त्याचा तपास होणारच. त्याच्याबद्दल त्यांच्या मनात शंका नाही, असे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूजा चव्हाण हिच्या आईवडिलांनी लिहिलेल्या पत्राचा हवाला दिला.त्याचप्रमाणे पुण्यातील जे त्यांचे नातेवाईक आरोप करीत आहेत तेही त्यांचे रक्ताचे नातेवाईक नसल्याचे मुलीच्या आईवडिलांनी सांगितले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येबाबत कोणीच का बोलत नाही!

गेल्या आठवडय़ात खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली त्याबद्दल कोणीच का बोलत नाही. संजय राठोड यांच्याबद्दल संशय व्यक्त करता, तिथे सुसाइड नोट नाही तरीही गुन्हा दाखल करण्याची मागणी करता. पण डेलकरांची 13 ते 14 पानांची सुसाइड नोट आहे. त्यामध्ये विशिष्ट नावं लिहिली गेली आहेत. त्यामध्ये उच्चपदस्थ नेते असतील तर त्यांचाही राजीनामा घेतला गेला पाहिजे. पोलिसांनी असा या प्रकरणाचा तपास सुरू केला असून पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी त्यांना सहकार्य करावे असे मुख्यमंत्री म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER