होळी, धूलिवंदनातून वाईट गोष्टींना हद्दपार करण्याची प्रेरणा ; मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांना सल्ला

Maharashtra Today

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)जनतेला होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा (Dhulvandan Festival)दिल्या आहेत. परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करा. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले आहे.

निसर्गही रंगाची उधळण करतो. आपल्या आयुष्यातही रंग भरतो. रंग आनंद, सुख-समृद्धी घेऊन येतात. त्यामुळे रंगाचा सण साजरा करतानाही आपल्याला परस्परांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गर्दी नकोच. एकत्र येणे टाळून कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखणे या देखील परस्परांसाठी शुभेच्छा आहेत. सदिच्छा आहेत, असे मानून सण साजरे करावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक ठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत. आज (रविवार 28 मार्च) ते 15 एप्रिल 2021 पर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू असणार आहे. हा कर्फ्यू रात्री आठ ते सकाळी सातपर्यंत असेल. या वेळेत उद्याने, चौपाट्या अशा सार्वजनिक ठिकाणीही एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्क वापरणे, हात धुणे या त्रिसुत्रीचे पालन अत्यावश्यक आहे. गृह विभागानेही हे सण साधेपणाने साजरे करावेत, अशी सूचना दिली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचेही आदेश काढण्यात आले आहेत. या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन सण-उत्सव साजरे करावेत. होळी, धुलिंवदन सण यातून वाईट गोष्टींना हद्दपार करण्याची प्रेरणा घेऊया, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER