‘लाभाच्या पदां’मुळे शिवसेनेच्या दोन मंत्र्यांचे पुनर्वसन गोत्यात

CM-thackeray-take-resignation-arvind-sawant-and-ravindra-waikar

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शिवसेनेने केंद्रात मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले खासदार अरविंद सावंत आणि राज्यात मंत्रिपदापासून दूर राहिलेले आमदार रवींद्र वायकर यांचे राजकीय पुनर्वसन आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. भाजपने लाभाच्या पदांवर आक्षेप घेण्याअगोदरच शिवसेनेने या दोन्ही नेत्यांचे राजीनामे घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवेसेना आमदार आणि माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत यांच्या समन्वयक पदाचे (मंत्री दर्जा) राजीनामे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेऊन ठेवल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे. मात्र खासदार अरविंद सावंत आणि आमदार रवींद्र वायकर यांनी मात्र अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान , शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांची ११ फेब्रुवारीला मुख्यमंत्री कार्यालयात प्रमुख समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. तर १४ फेब्रुवारीला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली होती. राज्य शासनाने अधिकृत अध्यादेश काढून ही नियुक्ती करण्यात आली आहे. या अध्यादेशात वायकर आणि सावंत यांना देण्यात येणारे वेतन, भत्ते आणि सुविधा यांचा उल्लेख आता वादाचे कारण बनले आहे. कारण हे सरकारी लाभांचे पद आहे. ऑफिस ऑफ प्रॉफिट या नियमानुसार विरोधी पक्ष भाजपकडून आक्षेप घेतला जाण्याची आणि कोर्टात जाण्याच्या तयारीत असल्याची कुणकुण शिवसेनेला लागली आहे. याबाबत शिवसेनेने सावध पवित्रा घेतल्याची माहिती आहे.

भाजपाला मोठा धक्का देण्यासाठी शरद पवारांची ही असेल रणनीती!