मराठीचं वाकडं करण्याची हिंमत कोणाचीही नाही- मुख्यमंत्री ठाकरे

CM Uddhav Thackeray ShivSena

मुंबई :- जागतिक मराठी भाषादिनानिमित्त आज विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्वच पक्षांचे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषेबद्दल मत मांडले. “भाषा संस्कारांतून जन्माला येते.

जिजाऊंचे संस्कार असलेली आपली मराठी भाषा आहे. ही शक्ती आणि भक्तीची भाषा आहे. चिंतित भावनेनं मराठी भाषादिन साजरा करू नका.” असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. “जेव्हा जेव्हा आपल्यावर संकटं आली तेव्हा मदतीसाठी मराठी धावून आली आहे. स्वातंत्र्य चळवळीदरम्यानही ‘सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का’ हे विचारणारीही भाषा मराठी होती. परकीय आक्रमणावेळीही मराठी धावून गेली होती?” असं ठाकरे यावेळी म्हणाले. बुधवारी जेव्हा विधान परिषदेत मराठी भाषा सक्तीचं विधेयक मंजूर झालं त्या वेळी सभागृहात शांतता होती.

स्वातंत्र्य लढ्यात बाळासाहेब होते का? शिवसेनेला निलेश राणेंकडून प्रत्युत्तर

त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटलं. हे सांगताना मला कुणाचा अपमान करायचा नाही, असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला. “मराठीचं वाकडं करण्याची कोणाचीही हिंमत नाही. आज शाळांमध्ये मराठी सक्तीची का करावी लागते?” असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला. मराठीबाबत बोलताना त्यांनी आपल्या मातोश्री मीना ठाकरे यांची आठवण काढली. “मी शाळेत असताना माझी आई पाटीवर अ आ इ ई गिरवून घेत होती.” असंही ते म्हणाले. मराठी भाषा ही शुद्ध बोलली गेलीच पाहिजे, तशी ती शुद्ध लिहिलीही गेली पाहिजे.

ही बातमी पण वाचा : मराठी भाषेचा सन्मान जपणाऱ्या संस्था व मराठी मनांचा राबता वाढायला हवा! – शरद पवार

माझ्या आजोबांचा कटाक्ष होता की, मराठी भाषा ही ऱ्हस्व-दीर्घाप्रमाणेच उच्चारली गेली पाहिजे, असंही त्यांनी आपल्या आजोबांची आठवण काढताना सांगितलं. राज्यातील शाळांची नावं मराठीत का नाही, असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली. जुन्याची गरज आजही आपल्याला आहे, असं सांगताना त्यांनी घरातील लाईट आणि दिव्याचं उदाहरण दिलं.

“पूर्वी वासुदेव यायचे. आम्ही लहान असताना सकाळी वासुदेवांची वाणी ऐकायला यायची. नव्या पिढीला यातील अनेक गोष्टी माहीत नाहीत. मराठी ही जिजाऊंची भाषा आहे. मराठीनं काय दिलं? आपण इतिहास चिवडत असताना काही शिकत नाही. मराठी भाषा, संस्कृती टिकली पाहिजे, म्हणजे काय? आपल्याकडे शाळांची नावं मराठीत का नाही? संत तुकाराम, संत नामदेव, अशी नावं आपल्या शाळांना का नाहीत? असेही प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केले. मराठी बोलतो तसं मराठी ही पाहिलीही गेली पाहिजे, मराठीवर प्रेम म्हणजे इंग्रजीचा विरोध नाही. इंग्रजीवर प्रभुत्व मिळवूनही मराठीवर प्रेम करू शकतो. मराठी भाषा प्राचीन आहे का, याचे आज पुरावे द्यावे लागतात हे दुर्दैवी आहे. “अनेक संतांनी आपल्याला मोठा वारसा दिला आहे. तो वाढवता आला नाही, तरी आपल्याला तो टिकावता आला पाहिजे.

ही बातमी पण वाचा : मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी ही सदिच्छा – राज ठाकरे 

मराठी भाषा दिवस हा एका दिवसापुरता आणि वर्षापुरता मर्यादित न ठेवता आपलं संपूर्ण आयुष्य मराठी राहिलं पाहिजे.” असंही ते म्हणाले. परकीय आक्रमण होत असताना बये दार उघड म्हणणारी मराठी होती अन् सरकारच डोकं ठिकाणावर आहे का? हे विचारणारीही मराठी भाषाच होती. मी मुख्यमंत्री झालो, पण उद्या आपली आठवण काढली जाईल का? तेवढे जरी केले तरी भरपूर आहे. मराठी बोलत राहिलो तरी कशाची आवश्यकता नसल्याचे सांगत संपूर्ण आयुष्य मराठी असू द्या, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.


Web Title : CM uddhav thackeray speaks about marathi bhasha divas

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)