हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे?; मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना टोला

मुंबई : राज्यात काही दिवसांपूर्वी मंदिरं खुली करण्याच्या मागणीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून हिंदुत्वाच्या मुद्यावरून ताशेरे ओढले होते . राज्यपालांनी उपस्थित केलेल्या हिंदुत्वाच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी मुलाखतीतून उत्तर दिलं. हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावे लागते . धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना टोला लगावला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) वर्षपूर्ती निमित्त उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली. कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान राऊत यांनी राज्यपाल व भाजपाकडून उपस्थित करण्यात आलेल्या हिंदुत्वाच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला. अनेकदा सध्या असं वर्षभरात दिसतं.. खरं तर देशात हे चित्र दुर्मिळ आहे की, एक बहुमताचं सरकार काम करत असताना राजभवनामध्ये समांतर सरकार चालू आहे. एक समान धागा याच्यात असा आहे की, राज्यपाल आणि भारतीय जनता पक्ष (BJP) दोघांचाही एकच आरोप आपल्यावरती आहे, तो म्हणजे तुम्ही हिंदुत्व सोडले का?, असे संजय राऊत म्हणाले.

या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले,”जाऊ द्या हो, करू दे हो… करू दे त्यांना मजा. हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे? हिंदुत्व सोडणे म्हणजे काय? धोतर नाहीये ते.. हिंदुत्व अंगामध्ये, धमन्यांमध्ये असावं लागतं. धमन्यांमध्ये भिनलेली गोष्ट अशी नाही सोडू शकत,” अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना टोला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER