हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे करणार शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा?

CM Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताच मोठमोठाले निर्णय घेण्यात येत आहे. यात मुख्यत्वाने शेतकरी कर्जमाफीचा पहिला आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा देण्याच्या विचारात आहेत. त्यासाठी त्यांनी मंत्रालयात बैठकांचा धडाका सुरू केला असून, सोमवारी वित्त, कृषी, मदत पुनर्वसन आणि सहकार खात्यांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत सर्व खात्यांचे संबंधित अधिकारी आवर्जून उपस्थित होते.

आघाडीचे सरकार राज्यातील शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देणार असून, त्याची घोषणा नागपूर येथे १६ डिसेंबरपासून सुरू होणार्‍या हिवाळी अधिवेशनापूर्वीच करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मानस आहे. अवकाळीची नुकसानभरपाई आणि शेतकर्‍यांचे कर्ज हे दोन विषय असून, त्याला लागणारा निधी आणि कर्जाचा तपशील याचा आढावा घेण्यात येत आहे.

मुख्यमंत्रीपद स्विकारण्यास उद्धव ठाकरे तयार नव्हते : शरद पवारांचा खुलासा

कोणतेही जाचक नियम आणि अटी न लावता, हेक्टरी मर्यादा न घालता, थकबाकीदार शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. कर्जमाफीसाठी सुमारे ४० हजार कोटींची आवश्यकता असल्याचे वित्त विभागातील उच्चपदस्थांकडून समजते.

बुलेट ट्रेनऐवजी महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या हिताला प्राधान्य देत राज्याच्या वाट्याचा निधी कर्जमाफीसाठी वापरण्यात येणार आहे.

सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने निधी कुठून आणायचा, असा मोठा प्रश्न आघाडी सरकारपुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनसाठी राखून ठेवलेला निधी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी वापरण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबई-अहमदाबाददरम्यान असलेल्या बुलेट ट्रेनचा सुमारे १ लाख १० हजार कोटी रुपयांचा प्रकल्प केंद्रातील भाजप सरकारने महाराष्ट्र आणि गुजरातसाठी निश्चित केला आहे. मात्र, महाराष्ट्रापेक्षा या प्रकल्पाचा सर्वाधिक लाभ हा गुजरातला होणार आहे. मग त्यापोटी महाराष्ट्राने सुमारे ३० ते ४० हजार कोटी का द्यायचे, असा विचार आघाडीच्या नेत्यांमध्ये झाला आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनचा राखून ठेवलेला हा निधी शेतकरी कर्जमाफीसाठी वापरण्यात यावा, अशी आघाडीच्या नेत्यांमध्ये सहमती झाली असल्याची माहिती पुढे येत आहे.