कोरोनाचे संकट जाणून आधीपासूनच लष्कराकडून मार्गदर्शनाची तयारी होती – मुख्यमंत्री ठाकरे

CM Uddhav Thackeray
  • मी मोदींना तुमचं नाव घेऊन जनतेला आवाहन करणार असल्याचं सांगितलं होतं.
  • विमानतळावर घेण्यात आलेली चाचणी चुकीची होती. केवळ ताप आहे का हे तपासणं खूप ढोबळ होतं. पूर्ण चाचणी केली जावी असा माझा तेव्हाही आग्रह होता.

मुंबई :- देशात आणि राज्यातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील फुगलेली कोरोनाची रुग्णसंख्या पाहता  स्थिती हाताळण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरल्याचा ठपका विरोधी पक्षाने ठेवला आहे. परिणामी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणीदेखील विरोधकांनी केली;

परंतु, महाराष्ट्रात कोरोनाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितले. एवढेच नाही तर, कोरोनाचे संकट खूप आधीच जाणून आपली लष्कराचे मार्गदर्शन घेण्याचीही तयारी होती, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. युद्धपातळीवर रुग्णालयं उभारण्यासाठी लष्कराकडून मार्गदर्शन घेण्याची आपली तयारी होती. आपल्याला युद्धपातळीवर रुग्णालयं उभारली पाहिजेत, असं मी आधीपासूनच सांगत होतो. लष्कराला बोलवायचं नाही; पण त्यांची मदत घेण्याची तयारी होती, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. ते लोकसत्ताच्या वेबिनारमध्ये बोलत होते.

उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, “मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. एका पर्यटकाच्या ग्रुपसोबत तो गेला होता. ते सर्व दुबईतून आले होते. परदेशातून येणाऱ्यांची जी यादी दिली होती, दुबईचं नाव त्यात नव्हतं; पण आपण ताबडतोबत पावलं उचलली होती. सामूहिक सोहळे, मॉल्स, स्टेशन बंद केली. आपल्याला युद्धपातळीवर रुग्णालयं उभारली पाहिजेत असं मी आधीपासूनच सांगत होतो. त्यासाठी लष्कराचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे असं माझं मत होतं.

मी लष्कराच्या धर्तीवर रुग्णालयं उभारण्यास सुरुवात करा असं सांगितलं होतं. अनेकांना आपण इथपर्यंत जाऊ असे वाटत नव्हते. पण, राज्यात जिथे गरज लागेल तिथे मोठी रुग्णालयं उभारण्यास सांगितले आहे. गरज लागल्यास ते वापरावे लागतील.

विमानतळावर घेण्यात आलेली चाचणी चुकीची होती. केवळ ताप आहे का हे तपासणं खूप ढोबळ होतं. पूर्ण चाचणी केली जावी असा माझा तेव्हाही आग्रह होता.”

ठाकरे म्हणाले, “केंद्रावर टीका करण्याची माझी कोणतीही इच्छा नाही. लॉकडाऊन जाहीर झाला तोपर्यंत मुंबई-पुण्यातील आपलीच बरी लोक बाहेरून आली आणि आपापल्या वस्त्यांमध्ये गेली.  आता लॉकडाऊन अचानक उठवणं योग्य की आयोग्य हा विचार करावा लागेल.” असंही ठाकरे म्हणाले.

लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर लोकांचा गोंधळ झाला. त्यामुळे मला रात्री निवेदन देत लोकांना दुकानं, जीवनाश्यक गोष्टी सुरू राहतील असं सांगावं लागलं. मी मोदींना तुमचं नाव घेऊन जनतेला आवाहन करणार असल्याचं सांगितलं होतं, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

“८० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं नाहीत. अनेक रुग्ण कोणत्याही औषधाविना बरे झाले आहेत. एकीकडे दिलासा असला तरी हे धोकादायकदेखील आहे. आता पावसाळा येणार असल्याने मोठं आव्हान आहे. आपल्याकडे सर्दी, खोकल्याची साथ नसतानाही कोरोनाचा प्रसार होत आहे. थकवा येणं, कंटाळा करणंही कोरोनाचं लक्षण आहे.” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER