कठीण काळात उद्योगांनी कामगारांच्या नोकऱ्या घालवू नका – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray

मुंबई :- देशभरासह राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदीवस वाढतच चालले असून प्रत्येकाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आपण सर्वतोपरी प्रयत्न करून या साथीला रोखत असलो तरी जीवन पूर्वपदावर कधी येणार हे सांगता येत नाही. या कठीण प्रसंगात उद्योगांनी आपल्या कामगारांना वाऱ्यावर सोडू नये, कारण त्यांच्या उद्योग व्यवसाय उभारणीत कामगारांचा मोठा वाटा असतो. त्यामुळेच भलेही काही काळासाठी वेतन कपात केली तरी चालेल पण कामगारांच्या नोकऱ्या घालवू नका. आपण स्वत: यासंदर्भात काही व्यवस्थापनांशी बोलणार आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते बोलत होते.

मुंबई आणि पुण्यासारख्या भागात कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. मात्र, एप्रिल शेवटापासून आपण ग्रीन आणि ऑरेंज क्षेत्रातील उद्योग व्यवसायांना अटी आणि शर्तींच्या अधीन राहून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. आज अनेक उद्योग त्या ठिकाणी सुरु झाले असून कामगारही रुजू झाले आहेत. पुरेशा क्रयशक्तीच्या अभावी अद्याप बाजारपेठांत ग्राहक नसल्याने काहीशी अडचण आहे. परंतु परिस्थिती सुधारत जाईल. आपण कुठेही मालवाहतुकीला थांबवलेले नाही, माणसांची वाहतूक थांबवली आहे जेणेकरून साथीचा प्रसार होणार नाही. जिथे उद्योग सुरु झाले आहेत तिथे आपण व्यवस्थापन आणि कामगार यांच्या कोविड दक्षता समित्या स्थापन करू शकतो का, ते पाहिले पाहिजे जेणेकरून उद्योगांत आरोग्यदायी व सुरक्षित वातावरण तयार होईल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले .

दरम्यान या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई आदी सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER