पंखात बळ दिले आहे, जिंकण्याची जिद्द ठेवा! ; उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray

मुंबई :- तुमच्या पंखांमध्ये शिक्षक, मार्गदर्शकांनी बळ दिले आहे. आता जिंकण्याची जिद्द ठेऊन भरारी घ्या, असे आवाहन करतानाच विजयी भवचा मंत्रही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रीय छात्रसेनेच्या सैनिकांना दिला. भारताच्या प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतील राजपथावरील ध्वजसंचलनामध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या चमूला प्रोत्साहन आणि शुभेच्छा देतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. दूरदृश्यप्रणालीद्वारे त्यांनी दिल्ली येथे शिबीरात सहभागी छात्रसैनिकांशी संवाद साधला.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या. श्री.ठाकरे म्हणाले, राष्ट्रीय छात्र सेनेच्या छात्रसैनिकातूनच पुढे काही देशाच्या रक्षणासाठी सज्ज होतात. तेव्हा मात्र ज्यांना तीळगुळाची भाषा समजत नाही त्यांना सडेतोड भाषेत उत्तर द्यावे लागेल. आणि हे माझ्या छात्रसैनिकांना नक्कीच माहित आहे. भारतात सैनिकी शिक्षण सक्तीचे नाही. तरीही राष्ट्रीय छात्र सेना हे जगातील एक मोठे छात्रसेना संघटन आहे. कित्येकदा आपल्या पाल्यांने मात्र नीटनेटके आणि चाकोरीबद्ध आयुष्य जगावे, असे अनेक पालकांना वाटते. अशा परिस्थितीतही आपल्या पाल्यांना छात्रसेनेत सहभागी होण्याच्या स्वप्नांना बळ देणाऱ्या पालकांबद्दल नक्कीच विशेष आदर वाटत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणाले, प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील संचलनात तुम्हाला संपूर्ण जग बघणार आहे. तेव्हा आपल्या महाराष्ट्राचा पहिला क्रमांक यावा, याच जिद्दीने तुम्ही पाऊल टाकावे. प्रतिवर्षीप्रमाणे दिल्ली गाजवून विजयी भव, असा मंत्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी छात्रसैनिकांना दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER