हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray

मुंबई :- हिंमत असेल तर महाविकास आघाडीचं सरकार उद्या कशाला, आजच पाडून दाखवा, असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिलं आहे. इतकंच नाही तर ऑपरेशन लोटस काय, तुम्हालाच लोटलं ना लोकांनी, असं म्हणून भाजपाच्या ऑपरेशन लोटसचीही त्यांनी खिल्ली उडवली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून हे सरकार फार काळ टिकणार नाही, असं भाजपाकडून सांगितलं जात आहे. त्या टीकेला आज उद्धव ठाकरेंनी थेट आव्हान देत हिंमत असल्यास उद्या नाही आजच महाविकास आघाडीचं सरकार पाडून दाखवा, असं म्हटलं आहे.

मी राजकारणात आले, माझा भाऊ का नाही’?; पुनम महाजनने सांगितले गुपित

जळगावात मुक्ताईनगरमध्ये महाविकास आघाडीच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत आहेत. दरम्यान, सत्ता गमावल्यानंतर भाजपकडून वारंवार महाविकास आघाडीचे सरकार पडेल, मध्यावधी निवडणुका होतील असे सूतोवाच केले जाते. शिवसेनेने निवडणूक निकालानंतर भाजपाची साथ सोडून कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन केले व भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले.

हेच शिवसेनेचे वागणे भाजपाच्या जिव्हारी लागले असल्याने हे सरकार कधी पडेल अशा विचारात भाजपाचे नेते असताना दिसतात. त्याला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी थेट चॅलेंज दिले आहे. तसेच, वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही काल एनआरसी लागू करण्यावरून या सरकारचे भवितव्य १ एप्रिलला ठरेल, असे विधान केले होते.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारविरोधात एल्गार पुकारत भाजपा नवी मुंबईत १६ फेब्रुवारीला अधिवेशन घेणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील किंवा अन्य भाजपा नेते सातत्याने महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे बोलत असतात. त्यांना उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे.

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असे थेट आव्हानच ठाकरे यांनी भाजपाला दिले आहे. मुक्ताईनगर येथे आज महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा होत आहे. येथे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले आहेत.