मुख्यमंत्री उद्धव समोर २ प्रमुख समस्या : कोविड-१९ आणि फडण-२०

Fadnavis & Thackarey

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “राज्य के नाम संदेश”मध्ये राजकारणावर भाष्य केले. विरोधकांना राजकारण करू द्या मी राजकारण करणार नाही, कारण ती माझी संस्कृती नाही.महाराष्ट्राचा माझ्यावर विश्वास आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही, असे ते बोलले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव त्यांनी घेतले नाही पण त्यांचा संपूर्ण रोख हा फडणवीस यांच्यावर होता.

लॉकडाऊनच्या काळामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. यासाठी जबाबदार कोण होतं आपण काय करायला हवं होतं आणि आपण कुठे भरकटलो याचा आजही गांभीर्याने विचार होताना दिसत नाही.सरकार रोजच्या बातम्या काढते,त्यात किती रुग्ण आज बरे होऊन घरी गेले हे सांगण्याची फुशारकी अधिक असते.मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे ही बाब कुठेतरी तिसऱ्या-चौथ्या परिच्छेदामध्ये मांडलेली असते असा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा सरकारी उपाययोजना चुकत असल्याबद्दल आवाज उठवला.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्राचा कोरोनाविरुद्धचा लढा पूर्णतः प्रशासनाच्या हातात पहिल्यापासून दिला गेला. मंत्री, आमदार, इतर लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेतले गेले नाही. अनेक ठिकाणी मंत्री विरुद्ध जिल्हाधिकारी, आमदार विरुद्ध जिल्हाधिकारी असा संघर्ष झाला वाद झाले. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नेमके याच उणिवेवर बोट ठेवले. राज्याचे मुख्य सचिव हे सुप्रीम असल्याचे ते म्हणाले लोकप्रतिनिधींची प्रातिनिधिक भावना त्यांनी व्यक्त केली.

केंद्रीय पथक सुरुवातीच्या काळात मुंबई आले तेव्हा त्यांनी अनेक बाबतीत राज्य सरकारला सचेत केले होते. त्यात धारावीमध्ये प्रादुर्भाव वाढेल, असे त्यांनी बजावले पण त्याकडे म्हणावे तितके गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही. वैद्यकीय सामग्रीच्या खरेदीमध्ये आपण विलंब लावला. आपल्या तुलनेत गुजरात,मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांनी पीपीइ किटपासून आवश्यक ती खरेदी सुरुवातीच्या दहा दिवसातच करून टाकली.आपल्याकडे घोळ सुरू राहिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती खरेदीचे अधिकार दिल्याने गोंधळात भर पडली. लॉकडाऊनमुळे सामुग्री उपलब्ध नाही म्हणून ती वाटेल त्या दराने खरेदी करा या नावाखाली हे सगळे झाले ,खरेदीच्या नावाखाली दुकाने थाटली . राज्यात आतापर्यंत 27 पोलिसांचा बळी गेला. दोन हजारावर पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. कोरोना योध्यांची अशी गत होणे दुर्दैवी आहे.

राज्य शासनाची आर्थिक परिस्थिती बिकट आहे ही गोष्ट मान्य, पण आज सव्वादोन महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे गोरगरीब माणूस हैराण, परेशान झालेला आहे. हे कटूसत्य आहे की तो आत्महत्येच्या दारात उभा आहे. सोनार,लोहार, सुतार,चांभार, कुंभार, वासुदेव, भटजी, बँडवाले चहावाले, टपरीवाले, फुलवाले, हातगाडीवाले, हॉकर्स, देवस्थानाजवळ व्यवसाय करणारे लोक यांची जिंदगी बेहाल झाली आहे. अशा बाराबलुतेदार वर्गासाठी किमान जगण्यासाठीचे पॅकेज राज्यशासनाने द्यायला हवे होते.अजूनही वेळ गेलेली नाही, उद्या निर्णय करा. या राज्यातील अडलेला,नडलेला,बेजार झालेला माणूस सरकारला दुवा दिल्याशिवाय राहणार नाही.

केंद्र सरकारने ज्या प्रमाणे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले त्याच धर्तीवर राज्य सरकारनेही हे पॅकेज द्यावे अशी मागणी फडणवीसांनी केलेली होती.ठाकरे यांनी ही मागणी धुडकावून लावताना आता राज्य सरकार जेजे करत आहे ते पॅकेज नाहीतर काय आहे असाच सवाल जणू विरोधकांना केला आणि राज्य शासन केलेल्या उपाययोजनांचा पाढा वाचला. ‘केंद्राने काय दिले ते आम्हाला कळत नाही पण या राज्यातला शेवटचा माणूस जगला पाहिजे यासाठी आम्ही राज्य शासनाचे स्वतंत्र पॅकेज देत आहोत’अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली असती तर फडणवीस यांची बोलती बंद झाली असती.

देवेंद्र फडणवीस यांच्या मते कोरोनाच्या मुकाबल्यात राज्य सरकार कुठे कमी पडत आहे हे विरोधी पक्षनेते म्हणून सरकारला दाखवून देण्याची त्यांची जबाबदारी आहे. .भाजपसोबत पाच वर्षे सत्तेत असताना शिवसेनेने एकाचवेळी सत्तारूढ व विरोधी पक्षाची भूमिकादेखील बजावली. ते चालले आणि आता विरोधीपक्ष काही बोलत असेल तर ते राजकारण हा असा दुजाभाव कशासाठी? विरोधकांनी केलेल्या आरोपांना मुद्देसूद उत्तरे देण्याची मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे, ते ती टाळत आहेत. विरोधक राजकारण करीत असल्याचा प्रचार केला की मग विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाही तरी चालते हा स्वतःचा बचाव करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे.

महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या मुकाबल्यासाठी काहीच केले नाही असे कोणीही म्हणणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून आजही लोकांना खूप अपेक्षा आहेत.परंतु देवेंद्र फडणवीस हे रोज नवीन प्रश्न उपस्थित करीत आहेत. त्यांना सरकारकडून तेवढेच ठोस उत्तर आले तर विरोधकांच्या प्रश्नांमधील हवा निघेल. तसे केले नाही तर सत्तापक्ष आणि विरोधकांमधील संघर्ष वाढत जाईल.. राज्याच्या आजच्या परिस्थितीला हा संघर्ष परवडणारा नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER