अखेर राठोडांची गच्छंती; राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी, राज्यपालांकडे पाठवणार

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Case) प्रकरणात नाव आल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना राजीनामा सोपवला होता. मात्र त्यांचा राजीनामा मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी वाट बघत होता. आता मात्र त्यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केली असून, पुढच्या सोपस्कारासाठी लवकरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat singh koshyari) यांच्याकडे पाठवला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आज राजीनाम्यावर स्वाक्षरी करुन संजय राठोडांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्बत केले आहे.

संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी रविवारी (28 फेब्रुवारी) राजीनामा दिला होता. मात्र संजय राठोड यांचा राजीनामा अजून राज्यपालांकडे पाठवलाच नसल्याची माहिती समोर आली होती. तीन दिवस उलटले तरी संजय राठोड यांचा राजीनामा अजून मुख्यमंत्र्यांकडेच आहे का? असा प्रश्न विरोधकांनी कालपासून उपस्थित केला होता. राजीनामा देण्याआधी पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर राजीनाम्याचा स्वीकार करावा अशी विनंती संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आपले मंत्रिपद टिकावं म्हणून संजय राठोड शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा दबाव होता. या प्रकरणावरुन शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली जात होती. त्यामुळे अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राठोडांच्या राजीनाम्यावर स्वाक्षरी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER