मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला धक्का, जिंतूर बाजार समिती अशासकीय प्रशासक मंडळाच्या नियुक्तीला स्थगिती

CM Uddhav Thackeray

मुंबई : मागील काही दिवसांपासून शिवसेना-राष्ट्रवादीत धुसफूस सुरु असल्याचं दिसून येत आहे. नुकताच परभणी जिल्ह्यातील जिंतूर आणि इतर बाजार समितीवर प्रशासक नियुक्त करण्यावरून वाद झाला होता. येथे राष्ट्रवादीचा शासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले आहे. तसेच जिल्हास्तरावरील अशासकीय समित्यावर सदस्यांची नियुक्ती करण्यावरूनही शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादीचा आमदार नसलेल्या मतदारसंघातही शिवसेनेला विचारात घेतले जात नसल्याचा आरोप करत जाधव यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना आपल्या खासदारकीचा राजीनामा पाठवला होता.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जाधवांना मुंबईत बोलावून समजूत काढली होती. ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार-खासदार आहेत अथवा इतर पक्षाचे खासदार आहेत त्याप्रमाणे निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी जाधवांना दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिंतूर-मानवत बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळाच्या नियुक्तीला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या प्रस्तावावर निर्णय घेताना उद्धव ठाकरे यांनी हा स्थगिती आदेश दिला. २५ ऑगस्टला संबंधित अशासकीय प्रशासक मंडळ नेमण्यात आले होते. त्यानंतर परभणी शिवसेनेतून याविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली होती. शिवसेना-राष्ट्रवादीच्या स्थानिक स्तरावरील वादात आता थेट मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. आता राष्ट्रवादीच्या हातात असलेली जिंतूर-मानवत बाजार समितीच्या अशासकीय प्रशासक मंडळाच्या नियुक्तीला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्याने दोन्ही पक्षातील वाद चिघळण्याची दाट शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या भूमिकेवर आता राष्ट्रवादीचे नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचे लक्ष्य लागलेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER