मुख्यमंत्री ठाकरे यांचे कोल्हापुरात खंडपीठासाठी आश्वासन

CM Thackeray

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासाठी राज्य शासन सकारात्मक आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी बोलताना दिली. खंडपीठासाठी लागणार्‍या सर्व तांत्रिक बाबींसह निधीची उपलब्धता करून देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेबाबत राज्य शासन आणि न्याय यंत्रणेकडून ठोस निर्णय व्हावा, यासाठी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, मंत्री जयंत पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री ठाकरे यांची सायंकाळी भेट घेऊन कोल्हापूर खंडपीठ सर्वपक्षीय नागरी कृती समिती व कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनमार्फत निवेदन सादर केले.

कोल्हापूर खंडपीठासाठी पक्षकार, वकिलांच्या तीन पिढ्या रस्त्यावर संघर्ष करीत आहेत. अनेक आंदोलने झाली. पण आश्वासनाशिवाय काहीच पदरात पडले नसल्याचे प्रा. पाटील यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. अन्यथा कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांतील जनता पुन्हा रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. संघर्षाशिवाय कोल्हापूरकरांना काहीच मिळत नाही, अशी भावना निर्माण झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्याशी आपण स्वत: मुख्यमंत्री या नात्याने चर्चा करावी, अशीही त्यांनी विनंती केली. जयंत पाटील यांनीही कोल्हापूर खंडपीठासाठी सहा जिल्ह्यांतील जनता आग्रही असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

ठाकरे म्हणाले, कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेबाबत शिष्टमंडळाशी यापूर्वीही अनेक वेळा चर्चा झाली आहे.

खंडपीठासाठी ३४ वर्षांपासून लढा सुरू आहे. कोल्हापूर खंडपीठाबाबत शासन सकारात्मक आहे. शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेऊन चर्चा केली. अजित पवार म्हणाले, खंडपीठाच्या पूर्ततेबाबत निश्चित पाठपुरावा करण्यात येईल. तांत्रिक बाबीसह निधीबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.