कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री लवकरच जाहीर करणार- बच्चू कडू

Bacchu Kadu-CM Uddhav Thackeray

नागपूर :- राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानुसार आज लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली. राज्यातील एकूण १५ हजार ३५८ शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली असून, यात ६८ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेसाठी राज्यभरातील ३४ लाख ८३ हजार शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. लवकरच राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री लगेच जाहीर करणार असल्याची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी दोन टप्प्यात कर्जमाफी जाहीर केली होती. त्यानुसार पहिला टप्पा दोन लाखांच्या आत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी होता. २० ते २५ हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. दोन लाखांवर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा दुसरा टप्पा राहणार आहे. कर्जमाफी देताना गोंधळ होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितले.

याशिवाय, मागच्या युती सरकारने तीन योजनांचे एकत्रीकरण करून कर्जमाफी दिली होती. त्यामुळे बर्‍याच अडचणी पुढे आल्या होत्या. कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात असणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या बँकेचे पासबुक आणि आधार कार्ड ग्रामपंचायतच्या माध्यमातून बँकेत जमा करण्यासंदर्भात आपण अकोला जिल्ह्यात सूचना दिल्या असल्याची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी दिली.

‘ठाकरे’ सरकारकडून आनंदाची बातमी, शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर


Web Title : CM Thackeray announce second phase loan waiver will soon – Bacchu Kadu

Maharashtra Today : Latest Nagpur Marathi News only on Maharashtra Today