मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या बकरी ईदच्या शुभेच्छा

CM Uddhav Thackeray-Ajit Pawar-Eid

मुंबई : मुस्लिम बांधवांचा हा पवित्र बकरी ईद सण त्यागाचा संदेश देतो. त्याग आणि समर्पणातून मानव कल्याणाचा विचार सांगतो. याशिवाय सण साजरा करताना गोरगरीबांचाही विचार करण्यास सांगतो. मानवतेच्या विकासाच्या दृष्टीने दिलेल्या या संदेशाचा वसा घेऊन आपण समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू या, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (१ ऑगस्ट रोजी) साजरा होणाऱ्या बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कोरोना विषाणूच्या संकटामुळे हा सण आरोग्याची काळजी घेऊन आणि नियमांचे पालन करून शांततेत बकरी ईद साजरी करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम बांधवांना ‘ईद-उल-अजहा’ तथा ‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यावरील कोरोना संकट लक्षात घेऊन मुस्लिम बांधवांनी ‘बकरी ईद’ साधेपणाने साजरी करावी, सोशल डिस्टन्सिंग राखावं, सामुहिक नमाज पठण टाळून घरीच नमाज अदा करण्याचे आवाहन पवारांनी केले आहे.

मुस्लिम बांधवांनी रमजान काळात केलेलं सहकार्य यावेळीही करावं. कोरोनाचं संकट संपल्यानंतर आपण आपले सर्व सण पुर्वीप्रमाणे उत्साहात, आनंदात, सर्वांना सोबत घेऊन साजरे करु शकू, असा विश्वास देखील अजित पवारांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER